pimpari-standing-committee-chairman-jagtap-Landge | Sarkarnama

पिंपरी "स्थायी'चा अध्यक्ष जगताप समर्थक होणार, की लांडगे समर्थक ? 

उत्तम कुटे
शुक्रवार, 2 मार्च 2018

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार याचा फैसला उद्याच होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या दुपारी तीन ते पाच अशी अर्ज दाखल करण्याची वेळ व मुदत आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून एकच अर्ज दाखल करून ही निवडणूक बिनविरोध करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीची औपचारिकता व अध्यक्षांची घोषणा सात तारखेला स्थायी समितीच्या विशेष सभेत होणार आहे. 

पिंपरी : श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार याचा फैसला उद्याच होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी उद्या दुपारी तीन ते पाच अशी अर्ज दाखल करण्याची वेळ व मुदत आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपकडून एकच अर्ज दाखल करून ही निवडणूक बिनविरोध करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष निवडणुकीची औपचारिकता व अध्यक्षांची घोषणा सात तारखेला स्थायी समितीच्या विशेष सभेत होणार आहे. 

पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. 

पालिकेत आणि त्यामुळे स्थायी समितीमध्येही भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे त्यांचाच अध्यक्ष होणार यात कुठली शंका नाही. फक्त तो कुठल्या गटाचा होणार आणि तो नवा (राष्ट्रवादीतून आलेले) की जुना (मूळ भाजपाई) असणार याचीच काय ती उत्सुकता आहे. तसेच तो शहराचे कारभारी लक्ष्मण जगताप यांचा पाठीराखा असणार की आमदार महेश लांडगे समर्थक असणार याचेच औत्सुक्‍य आहे. या पदासाठी लांडगे समर्थक राहुल जाधव, जगताप यांच्याकडून शीतल शिंदे, तर जुने एकनिष्ठ भाजपाई म्हणून विलास मडिगेरी यांचे नाव घेतले जात आहे. 

स्थायीत 16 सदस्य आहेत. त्यात दहा भाजप, चार राष्ट्रवादी, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा असतो. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. तेवढेच सदस्य पुन्हा नव्याने निवडले जातात. त्यानुसार स्थायीमधील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले आहेत. त्यात भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीचे दोन आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्याजागी भाजपकडून राहुल जाधव, विलास मडिगेरी, शीतल शिंदे, ममता गायकवाड, नम्रता लोंढे, सागर अंगोळकर तर राष्ट्रवादीकडून प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर यांची स्थायीत वर्णी लागली आहे. 
 

संबंधित लेख