pimpari-standing-commitee-election-mamata-gaikwad | Sarkarnama

जुन्या-नव्याच्या भांडणात पिंपरी "स्थायी'च्या अध्यक्षपदासाठी ममता गायकवाडांची लॉटरी 

उत्तम कुटे
सोमवार, 5 मार्च 2018

अत्यंत ताणल्या गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ झाला. आमदार महेश लांडगे यांचे समर्थक राहुल जाधव आणि जुने भाजपाई शीतल तथा विजय शिंदे आणि विलास मडिगेरी या दोन "व्हीं'ना स्थायी अध्यक्षपदाची "व्ही' म्हणजेच "व्हिक्‍टरी' मिळाली नाही. 

पिंपरी : अत्यंत ताणल्या गेलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या चुरशीच्या निवडणुकीत दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ झाला. आमदार महेश लांडगे यांचे समर्थक राहुल जाधव आणि जुने भाजपाई शीतल तथा विजय शिंदे आणि विलास मडिगेरी या दोन "व्हीं'ना स्थायी अध्यक्षपदाची "व्ही' म्हणजेच "व्हिक्‍टरी' मिळाली नाही. 

"स्थायी'च्या पदाची ममता भाजप शहराध्यक्ष आणि पक्षश्रेष्ठींनी या स्पर्धेत अजिबात नसलेल्या एकदम नवीन व पहिल्यांदाच निवडून आलेल्या अननुभवी अशा ममता गायकवाडांना दाखविली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तयारीचे गणितही या निवडीमागे असल्याचे समजते. 

स्थायीच्या मावळत्या अध्यक्षा या भाजपच्या फायरब्रॅण्ड नगरसेविका सीमा सावळे होत्या. पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याऐवजी "हेडमास्टर' सावळेंनीच ती लावली होती. त्यामुळे अनुभवी अशा राष्ट्रवादीला तोंड देण्यासाठी त्यांच्यासारख्याच नगरसेवकाची स्थायीचे अध्यक्ष म्हणून वर्णी लागेल, असा अंदाज होता. तसेच शहराचे कारभारी असलेले भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्यात ठरलेल्या फॉर्म्यूल्याप्रमाणे स्थायी अध्यक्षपदासाठी आता लांडगे समर्थकाची बारी तथा टर्न होता. सावळे या जगताप समर्थक आहेत. त्यामुळे दोनदा निवडून आलेले जाधव यांचे नाव त्यासाठी घेतले जात होते. 

जुन्या भाजपाईंना पदे देताना डावलले जात असल्याने त्यांच्यावतीने दोनदा निवडून आलेले शिंदे व अनुभवी व स्थितप्रज्ञ असे मडिगेरी यांची नावे पुढे करण्यात आली होती. त्यांच्यात तीव्र संघर्षही सुरू झाला होता. त्यामुळे नव्याला (जाधव) हे पद दिले, तर अगोदरच नाराज असलेला जुना गट अधिक नाराज होण्याची शक्‍यता होती. जुन्याला स्थायीचे अध्यक्ष केले, तर आक्रमक लांडगे गट चवताळणार होता. यामुळे कात्रीत सापडलेल्या शहराध्यक्ष जगताप यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर हा पेच टाकून त्यातून स्वतःची सोडवणूक करून घेतली. मात्र, या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच (गायकवाड) लाभ आणि नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर आपल्याच समर्थकाची वर्णी लावल्याचे बालंट आलेच. 

अनपेक्षित निवडीबद्दल प्रतिक्रिया देणे गायकवाड यांनी खुबीने टाळले. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांचा कारभार हा कठपुतळीचाच राहणार असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. भाजप चाणक्‍यांच्याच सांगण्यानुसार त्यांची कारभाराची दिशा असेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

संबंधित लेख