पिंपरीच्या "स्थायी'त दोन्ही आमदारांना समान वाटा 

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी निवड करताना शहराचे दोन्ही कारभारी असलेल्या लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे या आमदारांना समान वाटा मिळाला आहे. त्यांच्या प्रत्येकी दोन-दोन समर्थकांची वर्णी लावताना दोन जुन्या भाजपाईंनाही समितीवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या, नव्यांना समसमान न्याय देत स्थायीत समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, खासदार अमर साबळे व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचा पाठीराखा नगरसेवक यावेळी, तरी समितीवर घेण्यात आलेला नाही.
पिंपरीच्या "स्थायी'त दोन्ही आमदारांना समान वाटा 

पिंपरी : श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी निवड करताना शहराचे दोन्ही कारभारी असलेल्या लक्ष्मणभाऊ जगताप आणि महेशदादा लांडगे या आमदारांना समान वाटा मिळाला आहे. त्यांच्या प्रत्येकी दोन-दोन समर्थकांची वर्णी लावताना दोन जुन्या भाजपाईंनाही समितीवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या, नव्यांना समसमान न्याय देत स्थायीत समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, खासदार अमर साबळे व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांचा पाठीराखा नगरसेवक यावेळी, तरी समितीवर घेण्यात आलेला नाही. 

भाजपच्या चाणक्‍यांनी स्थायी सदस्यांची निवड करताना एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. महापौरपदासाठी दावेदार असलेल्या शीतल शिंदे यांना स्थायीवर संधी दिल्याने महापौरपदी आपला समर्थक नेमण्याचा जगताप यांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महापौरपदी पुन्हा कुणबी असलेले शत्रुघ्न काटे विराजमान होण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. सभागृहनेतेपदी दावेदार असलेल्या विलास मडिगेरी यांचीही स्थायीवर नेमणूक करून विद्यमान सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या पदाचा दावेदार कमी केला गेला आहे. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष नवे येणार असले, तरी सभागृहनेते म्हणून पवार यांनाच कायम ठेवण्यात येणार असल्याचे संकेत आजच्या स्थायीच्या निवडीतून मिळाले आहेत. 

पिंपरी महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा असतो. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. तेवढेच सदस्य पुन्हा नव्याने निवडले जातात. त्यानुसार स्थायीमधील आठ सदस्य चिठ्ठीद्वारे बाहेर पडले.त्यात भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश आहे.अध्यक्षा सीमा सावळे यांचा देखील त्यात समावेश आहे. 

पालिका सभेत महापौर नितीन काळजे यांनी नव्या आठ सदस्यांची घोषणा केली. राष्ट्रवादीच्या बाहेर पडलेल्या दोन महिला सदस्यांच्या जागी पक्षाने पुन्हा गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर या दोन महिलांनाच संधी दिली आहे. भाजपने राहुल जाधव, शीतल शिंदे, ममता गायकवाड, नम्रता लोंढे, सागर अंगोळकर, विलास मडिगेरी यांची निवड केली. शिंदे आणि मडिगेरी हे जुने भाजपाई आहेत. जाधव आणि लोंढे हे दोघे लांडगे समर्थक लांडगे यांच्याच भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. अंगोळकर आणि गायकवाड हे जगताप समर्थक जगतापांच्याच चिंचवड मतदारसंघातील आहेत. शिंदे हे पिंपरीतून, तर मडिगेरी हे भोसरी मतदारसंघातील आहेत. 

सावळे या लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघातील असल्या, तरी त्या चिंचवडचे आमदार जगताप यांच्या कट्टर समर्थक आहेत. म्हणूनच त्यांची पहिल्याच वर्षी स्थायी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे आता या पदी लांडगे यांच्या पाठीराख्या नगरसेवकाचा टर्न आहे. त्यासाठी जाधव यांचे नाव अधिक चर्चेत आहेत. तर, सावळे या शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या आहेत. त्या नव्या असूनही त्यांना संधी दिल्याने आता जुन्याला स्थायीची अध्यक्ष करण्याची मागणी जुन्या नगरसेवकांतून होत आहे. त्यामुळे मनसेतून भाजपमध्ये आलेले जाधव की जुने एकनिष्ठ भाजपाई म्हणून शिंदे वा मडिगेरी यांना संधी दिली जाते, हे आता 7 मार्चलाच कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com