खासदार शिवाजीराव आढळरावांची अपरिहार्यता! 

खासदार शिवाजीराव आढळरावांची अपरिहार्यता! 

शिरुरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारात बारीक लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. रेड झोन, पुणे-नाशिक महामार्ग, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासह पालिकेच्या विकासकामांबाबत त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे त्याला दुजोरा देत आहेत. मात्र,ही त्यांची राजकीय अपरिहार्यता असल्याचे मानले जात आहे.

पिंपरी : शिरुरचे शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारात बारीक लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. रेड झोन, पुणे-नाशिक महामार्ग, वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासह पालिकेच्या विकासकामांबाबत त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे त्याला दुजोरा देत आहेत. मात्र,ही त्यांची राजकीय अपरिहार्यता असल्याचे मानले जात आहे. 

गतवेळी आढळराव यांना भोसरीतून सर्वाधिक मताधिक्‍य मिळाले होते. मात्र, नंतर विधानसभेला महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. कामाचा धडाका त्यांनी सुरू केला. त्यांचेच नाव लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार म्हणून घेतले जात आहे. परिणामी त्यांनी लोकसभेच्या लढाईचे मैदान भोसरी केले आहे. त्यातून भोसरीचा समावेश असलेल्या पिंपरी पालिकेला त्यांनी टार्गेट करण्यास सुरवात केली आहे. हे लक्ष्य करताना त्यांचा खरा रोख व टीकेचे लक्ष्य हे आमदार लांडगे हेच आहेत. लोकसभेला त्यांचा पत्ता कट करण्याचा त्यांचा बेत आहे. त्यामुळे आढळराव यांना भोसरी व पिंपरी पालिकेत बारीक लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच त्यांनी भोसरीत होणाऱ्या सव्वाचारशे कोटी रुपयांच्या रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. शहरातील टीडीआर वाटप आणि पंतप्रधान आवास योजनेतही अनियमितता झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रारसुद्धा केलेली आहे. 

राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर आढळराव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर गेल्या 13 वर्षांपूर्वीचा खेड आणि आताचा शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे आढळरावांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याने राष्ट्रवादीतील गटबाजी आणि भाजपच्या मतांच्या जोरावर आढळरावांनी हॅहॅट्रिक साधली. मात्र, शिरूरच्या खेळपट्टीवर जम बसवलेल्या दादांना आव्हान देण्यासाठी कमळाबाईंनी भोसरीचा पैलवान अर्थात आमदार लांडगे यांना मैदानात उतरवले. इतकेच नव्हे, तर आळंदी, खेड आणि जुन्नर नगरपरिषदेत आमदार लांडगे यांनी मैदान मारले. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाच्या जोरावर आमदार लांडगे यांनीही शिरूरच्या मैदानासाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत. बैलगाडा शर्यत खेळता-खेळता आमदार लांडगे यांनी चाकणच्या (तत्कालीन प्रस्तावित) विमानतळावरून थेट दिल्लीला "टेकऑफ' घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भोसरी आणि शिरूरच्या काही भागांत फ्लेक्‍सबाजी करण्यात आली. भावी खासदार, भावी मंत्री म्हणून लांडगे फ्लेक्‍सवर झळकू लागले. बघता-बघता खासदार आढळरावांना तगडा प्रतिस्पर्धी तयार झाला. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील सुमारे 380 कोटी रुपयांची विविध विकासकामे मार्गी लावून आमदार लांडगे यांनी व्हीजन-2022 ची मशागत सुरू केली. आळंदी, खेड आणि जुन्नर नगरपषिदेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उल्लेखनीय यश मिळवले. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत भोसरीतून शिवसेनेला एकाही जागेवर यश मिळवता आले नाही. त्यावेळी खासदार आढळराव पुढील धोक्‍याची स्पष्ट जाणीव झाली. भविष्यात भोसरीतील नेतृत्व लोकसभेच्या मैदानात आपली दमछाक करणार हे राजकीय पटलावरील भाकीत आढळरावांना उमगले. त्यानंतर खऱ्या अर्थाने आढळराव यांनी लांडगे यांची नाकाबंदी करायला सुरवात केली. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली. त्यामुळे शिरूरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पूर्वी युतीचे उमेदवार असल्यामुळे खासदार आढळरावांना भाजपला मानणारे मतदार पहिली पसंती देत होते. त्यातच राष्ट्रवादीतील गटबाजी आढळराव यांच्या पथ्यावर पडत होती. त्यामुळे आढळरावांचा वरचष्मा होता. मात्र, आता आढळरावांना मतदारांच्या "निगेटिव्हीटी'चा सामना करावा लागणार आहे. नवीन ताकदीचा पर्याय भाजपने दिल्यास आढळराव यांच्या विरोधातील मते भाजप उमेदवाराला मिळतील. राष्ट्रवादीतील आढळराव विरोधी गट भाजप उमेदवाराला मदत करील, अशी शक्‍यता राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे भाजपच्या मोदी लाटेत निवडून आलेले युतीचे खासदार म्हणून पूर्वी राजकीय मैदान गाजवणारे खासदार आढळराव आता महापालिकेतील सत्ताधारी भाजपाविरोधातच शड्डू ठोकताना दिसत आहेत.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com