भाजपमधल्या राड्याने पिंपरी मंत्रिपदाला मुकणार ?

पिंपरी व पुणे महापालिकेतल्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. दोन्ही ठिकाणी पक्षांत मतभेद असल्याने त्यांना मध्यस्थी करावी लागली. मात्र, स्थानिकपातळीवरील हा त्यांचा हस्तक्षेप मान्य नसल्याने दोन्ही ठिकाणी त्यावरून गोंधळ झाला.
भाजपमधल्या राड्याने पिंपरी मंत्रिपदाला मुकणार ?

पिंपरी : महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यालाच स्वीकृत सदस्यपदाचे बक्षिस दिल्याच्या रागातून पिंपरीत राडा झाला. पिंपरी-चिंचवड भाजप कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांकडून नेत्यांचे (राज्यसभेतील खासदार अमर साबळे व राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन पटवर्धन) पुतळे जाळल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र या घटनेमुळे पक्षाचे राज्यसभा सदस्य आणि बारामतीचे रहिवासी अमर साबळे यांच्या विरोधातली पक्षाध्यक्ष लक्ष्मण जगताप व भोसरीचे आमदार महेश लांडगे गटाची खदखदही समोर आली. शहरातला तीन गटातला हा संघर्ष अशापद्धतीने समोर आल्याने शहराला मंत्रीपद मिळण्याची शक्‍यता आता धूसर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

पिंपरीची हुकलेली ही संधी मावळ तालुक्‍यात जाण्याची शक्‍यता आहे. शहर भाजपमधील तीन गटातील सुप्त संघर्षही यामुळे टोकदार झाला असून त्याचा फटका पक्षाला भविष्यात बसू शकतो.तसेच हे प्रकरण आता पोलिसांत गेल्याने ते मिटण्याऐवजी चिघळण्याचाच संभव आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्वी मुंडे-गडकरी संघर्ष तीव्र होता. आताही हे गट आहेत. मात्र, पालिका निवडणुकीच्या तोंडावर व त्याआधी राष्ट्रवादीतून जगताप, लांडगे व आझम पानसरेंसारखे तालेवार नेते भाजपमध्ये आल्याने मुंडे-गडकरी मतभेदाला आता जुना, नवा असे वळण मिळाले आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी चिंचवड शाखेत आता दोन नव्हे, तर जगताप, लांडगे, साबळे आणि गडकरी असे चार गट पडले आहेत. त्यात पालिकेत पक्ष प्रथमच सत्तेत आल्याने या गटांमधील संघर्ष वाढू लागला आहे. शहराचा नेता व दादा होण्यावरून ही लढाई सुरु झाली आहे. त्यासाठी विविध पदावर आपल्याच समर्थकांची वर्णी लावण्यासाठी शहरातल्या मान्यवरांचा आटापिटा सुरु आहे. स्वीकृत सदस्य निवडीतही तो झाला. त्यात लांडगे, जगताप, पानसरे गटाला डावलण्यात आले. तिथे साबळे गटाची सरशी झाल्याने बाकीचे गट अस्वस्थ झाले होते. त्याचा स्फोट काल झाला आणि सगळा राडा झाला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा 9 तारखेला झाल्यानंतर चार दिवसांनी ही घटना होते, म्हणजे ती नक्की उत्स्फूर्त नव्हती.पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु असताना ती घडली हे विशेष. त्यावरून आता पक्षात तू, तू, मै मै सुरु झाले आहे. पालिका निवडणुकीत डावलले गेलेले पदाधिकारी राजू दुर्गे म्हणाले "" स्व.गोपीनाथ मुंढे यांचे नाव वापरून आपल्याच समर्थकांना संधी देणाऱ्या बारामतीकर साबळे यांच्या विरोधात हा उद्रेक आहे.'' 

साबळे यांचे उजवे हात असलेले माऊली थोरात यांनी पालिका निवडणुकीत संत तुकारामनगर प्रभागात पक्षविरोधी काम करूनही त्यांना स्वीकृत केल्याने हा उद्रेक झाल्याची प्रतिक्रिया राजेश पिल्ले यांनी व्यक्त केली. आपल्या संमर्थकांनी कालचा राडा केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. सभागृह नेते एकनाथ पवार आणि सरचिटणीस प्रमोद निसळ हेच त्याला जबाबदार असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला. भाजपच्या विचारधारेवरील हा हल्ला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या यांनी साबळे या घटनेला राष्ट्रवादीतून आलेले जगताप, लांडगे, पानसरे गटच जबाबदार असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. दरम्यान, या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवडला आगामी विस्तारात मिळणारे मंत्रीपद हुकण्याची शक्‍यता आहे. 

शहराध्यक्ष व दोनदा आमदार झालेले जगताप किंवा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना ते मिळणार होते. त्याऐवजी आता ते पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवणारे मावळचे तरुण,तडफदार आमदार बाळा भेगडे यांच्याकडे जाण्याचा संभव आहे. 


पक्षाच्या स्वीकृत सदस्य निवडीवरूनच भाजपमध्येच पुण्यातही असाच राडा नुकताच झाला होता. त्याची तीव्रता मोठी होती. त्याप्रकरणी दखलपात्र गुन्हा (एफआयआर) दाखल झाला. पिंपरीत अदखलपात्र (एनसी) नोंदविण्यात आला आहे. 

पिंपरी व पुणे महापालिकेतल्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. दोन्ही ठिकाणी पक्षांत मतभेद असल्याने त्यांना मध्यस्थी करावी लागली. मात्र, स्थानिकपातळीवरील हा त्यांचा हस्तक्षेप मान्य नसल्याने दोन्ही ठिकाणी त्यावरून गोंधळ झाला.

9 तारखेला नावांची घोषणा झाली,तरी 20 तारखेला स्वीकृत सदस्य निवड होणार असल्याने संधीला वाव आहे, असा काही कार्यकत्यांचा समज करून देण्यात आला. त्यामुळे त्यांनी हा राडा केल्याचे समजते. दरम्यान,पक्षश्रेष्ठीनी ही निवड केली असून त्यांचा निर्णय मान्य असल्याचे सांगत स्वीकृतपदी नाव जाहीर झालेले ऍड. मोरेश्वर शेडगे यांनी माघारीचीही तयारी दाखविली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com