Pimpari-Police | Sarkarnama

पोलिस वर्दीचा धाक हवा; गुर्मी नको 

उत्तम कुटे 
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सांगली व पिंपरीच्या दोन्ही प्रकरणांतून पोलिसच कायदा पाळत नाही, असे स्पष्ट झाले आहे. तसेच कौशल्यपूर्ण तपासाऐवजी थर्ड डिग्रीनेच तो करण्याकडे त्यांचा कल अजून मोठ्या प्रमाणावर असल्यालाही दुजोरा मिळतो आहे.

अनिकेत कोथळे या युवकाचा तीन महिन्यांपूर्वी सांगली येथे पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. चोरीच्या संशयावरून त्याला पकडण्यात आले होते. त्याला शिक्षा देण्याचे काम न्यायालयाचे होते. मात्र, पोलिसांची वर्दी अंगावर असलेल्या फौजदार युवराज कामटे याने स्वतःच न्याय केला. तो सुद्धा अघोरी. न्यायालयात कोथळेला सहा महिने शिक्षा झाली असती. मात्र, कामटेने त्याला थेट मृत्युदंडच दिला. यानिमित्त पोलिसांचे थर्ड डिग्रीचे प्रकरण पुन्हा उघडकीस आले. अशा उघड न आलेल्या घटना हजारो नाही, तर लाखोंच्या घरात असतील. कायद्याचे रक्षक असलेल्याने तो आपल्या हातात घेण्याची ही घटना आठवली. कारण थोड्याफार फरकाने अशीच घटना पिंपरी-चिंचवड येथेही नुकतीच घडली. येथे, मात्र जीव वाचला. पण पोलिसांना नसलेला मारहाणीचा अधिकार ते कसा बेमूर्वतपणे वापरतात, त्याचा पुन्हा प्रत्यय आला. यानिमित्त पोलिस कार्यपद्धतीवर पुन्हा भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

योगायोगाची बाब म्हणजे कामटे व साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले, त्याच दिवशी पिंपरीतील पोलिसांची ही दबंगगिरी उजेडात आली. सोशल मिडीयामुळे हा प्रकार समोर आला. अन्यथा तो ही दडपलाच गेला असता. गुंड आणि राजकारण्यांसमोर नांगी टाकणाऱ्या पोलिसांनी आपली मर्दुमकी पिंपरीत एका सामान्य वाहनचालकांविरुद्ध गाजवली आहे. 

नियम तोडणाऱ्या मध्यमवयीन टेंपोचालकाला तरुण वाहतूक पोलिसाने बेदम मारहाण केली. या पोलिसाचा इगो दुखावला होता. सांगूनही हा चालक थांबला नव्हता. त्यामुळे पोलिसांचा राग अनावर झाला. ही मारहाण चित्रित झाल्याने नंतर या चालकानेच अंगावर गाडी घातल्याचा न पटणारा बनाव या पोलिसाने केला. एकतर, अत्यंत वर्दळीच्या चौकात कुठलाही वाहनचालक जाणूनबुजून आणि ते सुद्धा पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचे धाडस करणार नाही. नशीब या चालकाने शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. नाहीतर, वर्दीच्या जोडीने हे आयपीसीचे 353 कलम हे सुद्धा पोलिसांना हत्यारच मिळाले आहे. क्षुल्लक तार्किक वाद घातला,तरी या कलमाचे हत्यार ते अनेकदा उपसत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे उल्टा चोर, कोतवाल को डांटे असे म्हणण्याची पाळी पोलिसांच्याच बाबतीत आली आहे. 

सांगली व पिंपरीच्या दोन्ही प्रकरणांतून पोलिसच कायदा पाळत नाही, असे स्पष्ट झाले आहे. तसेच कौशल्यपूर्ण तपासाऐवजी थर्ड डिग्रीनेच तो करण्याकडे त्यांचा कल अजून मोठ्या प्रमाणावर असल्यालाही दुजोरा मिळतो आहे. कामटेने तपास तर सोडा, न्यायनिवाडाही स्वतःच करून टाकला. पिंपरीच्या घटनेतही वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून दंड आकारण्याऐवजी त्याला पोलिसाने मारहाण केली. हा अधिकार त्यांना दिला कुणी? तो त्यांना मुळात नाहीच. मग ते त्याचा असा बेमूर्वतपणे वापर करतातच कसे? दुसरे म्हणजे असा कुणी पोलिसावर हात उचलला असता, तर लगेच शासकीय कामात अडथळा आला असता. तसा गुन्हाही दाखल झाला असता. मारहाण करणारा पोलिस कोठडीत पोचला असता. मात्र,मारहाण करूनही येथे ती करणाऱ्या पोलिसाची फक्त बदलीच का? त्याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल का नाही? यामुळे पोलिसांची प्रतिमा उजळण्याऐवजी समाजात ती आणखी बिघडतच चालली आहे. 

जनता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. ती सजग व जागृत झाली आहे. त्यामुळे पोलिसांची हडेलहप्पी ती आता सहन करीत नाहीत. त्यात अन्याय होत असेल, तर तो सुद्धा आता ती निमूटपणे सहन करीत नाही. दुसरीकडे पोलिसांनी ना आपली कार्यपद्धती बदलली. ना त्यांनी आपल्या तपासपद्धतीत बदल केला. त्यामुळे त्यांच्या आरे ला कारे चा जबाब मिळताच त्यांचे पित्त खवळले जात आहेत. वरिष्ठ आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांना जनता व तिच्या सहभागाचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे त्यांचा भर कम्युनिटी पोलिसिंगवर असतो. मात्र, खाली त्याची अंमलबजावणीच होत नाही. समाजाच्या मदतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याऐवजी पोलिस कर्मचारी समाज घटकालाच असे लक्ष्य करीत आहेत. त्यामुळे डॉक्‍टरांवरील हल्यांसारख्या पोलिस धुमश्‍चक्रीच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत. ते योग्य नाही. त्याला वेळीच पायबंद बसण्याची गरज आहे. पूर्वी हाफ चड्डीतील पोलिसांची फुल्ल जरब व दरारा होता. आता त्यांची फुल्ल पॅन्ट झाली. मात्र, दरारा हाफ सुद्धा राहिला नाही. त्याला दिवसागणिक ओहोटी लागली आहे. त्याचा विचार पोलिस खात्याने करण्याची वेळ आली आहे. 

संबंधित लेख