pimpari-officers or bjp workers | Sarkarnama

पिंपरी महापालिका अधिकारी, की भाजप कार्यकर्ते ? 

उत्तम कुटे
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या जोडीने प्रशासनालाही धारेवर धरण्यास विरोधी पक्ष राष्ट्रवादीने सुरवात केली आहे. शिवसेनेचे खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सत्ताधारी भाजपचे घरगडी, त्यांच्या हातची कठपुतळी अशा शेलक्‍या उपमा दिल्या होत्या. त्यानंतर आपल्या राजवटीत काम करून घेतलेल्या प्रशासनाला राष्ट्रवादीने आता लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या जोडीने प्रशासनालाही धारेवर धरण्यास विरोधी पक्ष राष्ट्रवादीने सुरवात केली आहे. शिवसेनेचे खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सत्ताधारी भाजपचे घरगडी, त्यांच्या हातची कठपुतळी अशा शेलक्‍या उपमा दिल्या होत्या. त्यानंतर आपल्या राजवटीत काम करून घेतलेल्या प्रशासनाला राष्ट्रवादीने आता लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे. पालिका अधिकारी हे भाजपचे कार्यकर्ते झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी आज केला. त्यांच्या प्रस्तावानुसार मंजूर झालेल्या योजनेच्या उद्‌घाटनाला त्यांनाच न बोलावता परस्पर भाजपने ती सुरु केल्याने त्या संतप्त झाल्या आहेत. 

महापालिकेतील काही अधिकारी हे सर्वसामान्य नागरिकांच्या कामांपेक्षा सत्ताधारी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते म्हणूनच काम करताना दिसून येतात. प्रभागातील समस्या सोडवण्यापेक्षा केवळ प्रसिद्धीपोटी चमकोगिरी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची मर्जी राखण्यातच ते धन्यता मानत आहेत. असे अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, की भाजपचे कार्यकर्ते? अशी संतप्त विचारणा धर यांनी केली आहे. 

राष्ट्रवादीच्या काळातील अनेक योजनांची उद्‌घाटने भाजपने सत्ता आल्यावर केली. ही कामे आपणच केली या थाटात त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच त्यांच्या स्थानिक नगरसेवकांना बोलावणेही टाळले. धर यांच्याबाबतीतही असाच प्रकार घडला. त्यामुळे त्या संतप्त झाल्या. त्यांनी एकाचवेळी भाजप आणि प्रशासनावर हल्ला चढविला. महिला व बालकल्याण समिती सदस्य असलेल्या धर यांनी गेल्यावर्षी 18 जुलैच्या समिती सभेत बालवाड्यामधील बालकांना स्वच्छता किट देण्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्यास सर्वानुमते मंजुरीही देण्यात आली. त्यानंतर हे किट देताना शहरातच नव्हे, तर धर यांच्या प्रभागातही त्यांना डावलले गेले. सत्ताधारी नगरसेविका व पालिका अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात प्रभाग 20 मधील बालवाड्यामध्ये जाऊन स्वच्छता किट वाटली. यावेळी प्रभागातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. फक्त फोटोबाजी करून भाजपने आपली राजकीय पोळी भाजून घेतली, असे धर यानंतर म्हणाल्या. 

शहरभर झालेल्या वृक्षारोपणातही महापालिका अधिकारी व सत्ताधारी नगरसेवकांनी वेळोवेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना डावलले असून प्रत्येकवेळी केवळ आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे कामच गेल्या वर्षात सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आल्याचा टोलाही धर यांनी लगावला. 

विनाअनुभवी भाजप सत्ताधाऱयांना वर्षभरात कोणतेही ठोस काम करता आले नाही. फक्त विरोधी पक्षाच्या कामांचे श्रेय लाटून चमकोगिरी करण्याचे काम त्यांनी चालवले आहे. हा मतदार शहरवासीयांचा घोर अपमान असल्याचेही त्या म्हणाल्या.  

 
 

संबंधित लेख