Pimpari news - Laxman Jagtap-Mahesh Landage crisis | Sarkarnama

पिंपरी पालिकेत आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांचाच वरचष्मा 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपकडून महत्त्वाच्या पदांवर शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप समर्थक दोन नगरसेवकांचीच वर्णी लागत असल्यामुळे पक्षातील इतर तरुण व होतकरू नगरसेवकांत नाराजीची भावना आहे. त्यामुळे पक्षातील महेश लांडगे गटही अस्वस्थ आहे. मात्र, दादा (महेश लांडगे) मंत्री होण्याची शक्‍यता असल्याने अस्वस्थ असूनही हा गट सध्या स्वस्थ आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपकडून महत्त्वाच्या पदांवर शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप समर्थक दोन नगरसेवकांचीच वर्णी लागत असल्यामुळे पक्षातील इतर तरुण व होतकरू नगरसेवकांत नाराजीची भावना आहे. त्यामुळे पक्षातील महेश लांडगे गटही अस्वस्थ आहे. मात्र, दादा (महेश लांडगे) मंत्री होण्याची शक्‍यता असल्याने अस्वस्थ असूनही हा गट सध्या स्वस्थ आहे. प्रथमच नगरसेवक झाल्याने नाराज असूनही अनेकजण उघडपणे बोलण्यास धजावत नाहीत. दरम्यान, दोघांची व ते सांगतील त्यांचीच वर्णी इतर पदांवर लागत असल्याने शहर भाजपमधील जगताप गटाचाच पालिकेवर वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) नुकत्याच झालेल्या निवडीतून ही सुप्त नाराजी समोर आली आहे. 

पालिकेतील सभागृहनेते एकनाथ पवार आणि स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे अशी या दोघा नगरसेवकांची नावे आहेत. ते जगताप यांचे समर्थक आहेत. महत्त्वाच्या व मोठ्या पदांवर विराजमान होण्याची त्यांची "हॅटट्रिक'सुद्धा झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजप पिंपरी पालिकेत सत्तेत आला. पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायीच्या अध्यक्षपदी सावळे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, सभागृहनेते म्हणून पवार यांना नेमण्यात आले. त्यामुळे पालिकेचा गाडा हे दोघेच सध्या हाकत आहेत. त्यामुळे लांडगे व खासदार अमर साबळे समर्थक नगरसेवकांत नाराजीची भावना आहे. महापौर हे शोभेचे पद लांडगे यांचे पाठीराखे नितीन काळजे यांना देऊन लांडगे गटाची बोळवण करण्यात आली. 

राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात केंद्रातील भाजप सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरीला डावलण्यात आले होते. नंतर, पुन्हा पिंपरीचा या योजनेत समावेश झाला."त्यासाठी "स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी' स्थापन केली गेली. या कंपनीच्या संचालक मंडळावरही पवार, सावळेंसह इतरांची नेमणूक करण्यात आली. तर, नुकत्याच बिनविरोध निवड झालेल्या "डीपीसी'च्या सदस्यपदीही पुन्हा या दोघांसह इतरांची वर्णी लागली आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांचा संयुक्त परिवहन उपक्रम "पीएमपीएमएल'च्या संचालक मंडळावरही हे दोघे महापौर व आयुक्तांच्या जोडीने आहेत. त्यामुळे किमान "डीपीसी'वर तरी आमची नेमणूक करायला हवी होती, अशी भावना भाजपच्या काही होतकरू तरुण नगरसेवकांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. तर, फक्त या दोघांचीच नियुक्ती महत्त्वाच्या पदावर होत असल्याने लांडगे गटात संतापच आहे. मात्र,पितृपक्षानंतर होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात दादांचा मंत्री म्हणून समावेश होण्याची शक्‍यता असल्याने हा संताप दाबून धरला असल्याचे एका दादा समर्थक नगरसेवकाने सांगितले. दरम्यान, या दोघांच्याच नियुक्ती का केली जाते, याची विचारणा करण्यासाठी शहराध्यक्ष जगताप यांच्याशी संपर्क करूनही तो झाला नाही. 
 

संबंधित लेख