pimpari-net-PCMC-building | Sarkarnama

आत्महत्या टाळण्यासाठी पिंपरी महापालिकेने बसवली जाळी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

मुंबईत मंत्रालयात शेतकरी आत्महत्या तसेच आत्महत्येच्या प्रयत्नाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचे लोण उद्योगनगरीत येऊ नये म्हणून प्रतिबंधक चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात काल (ता.23) संरक्षक जाळी बसविण्यात आली.  मात्र, हा आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरीसारखा प्रकार असल्याने ती चर्चेचा मोठा विषय झाली आहे.

पिंपरीः मुंबईत मंत्रालयात शेतकरी आत्महत्या तसेच आत्महत्येच्या प्रयत्नाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचे लोण उद्योगनगरीत येऊ नये म्हणून प्रतिबंधक चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात काल (ता.23) संरक्षक जाळी बसविण्यात आली.  मात्र, हा आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरीसारखा प्रकार असल्याने ती चर्चेचा मोठा विषय झाली आहे.
 
मंत्रालयाची इमारत बहुमजली आहे.त्यामुळे तीवरून आत्महत्या करण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. तेथे जाळीचा उपाय़ करण्यात आला. मात्र,तो कुचकामी ठरला. त्यामुळे तो वादग्रस्तही ठरला. कारण त्यानंतरही आत्महत्या व आत्महत्येच्या प्रयत्न तेथे झाले आहेत. 

मंत्रालयासारखा धोका नसताना तसेच तेथे निरुपयोगी ठरलेली जाळीच पिंपरीत बसविण्यात आली. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. पिंपरी पालिकेची इमारत बहुमजली नाही. ती जेमतेम चारमजली आहे. तिच्या पहिल्या मजल्यावर ही जाळी बसविण्यात आली आहे. पालिका इमारतीवरून कोणी आत्महत्या करण्याची शक्यता नाही. तसा प्रकारही झालेला नाही. असे असताना श्रीमंत पिंपरी पालिकेने ही जाळी बसविण्याचा नाहक खटाटोप का केला, याचीच चर्चा ती बसविल्यानंतर रंगली आहे. 

प्रत्येक कामात टक्केवारीची लागण झालेल्या पालिकेत या कारणातून,तर हे काम केले गेले नाही ना अशी कुजबुजही सुरु आहे.

दरम्यान, महापौर नितीन काळजे यांनी सुरक्षा जाळी बसविण्याची मागणी केली होती, असे समजले.

यासंदर्भात महापौर म्हणाले, शहरात पालिका हे एकमेव मोठे शासकीय कार्यालय आहे. दुसरीकडे शासकीय कार्यालयात व त्यातही मंत्रालयात आत्महत्येचा घटना घडत असल्याचे टीव्हीवरून पाहतो आहे. त्यामुळे असे प्रकार आपल्याकडे होऊ नये म्हणून प्रशासनाकडे आपणच ही मागणी केली होती. 

प्रतिबंधक उपाय म्हणून ही संरक्षक जाळी बसविण्यात आल्याचे पालिकेच्या स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी म्हणाले. 

अशी जाळी बसविण्याबाबत चार महिन्यापूर्वी आपण केलेल्या मागणीची दखल घेऊन ती बसविल्याबद्दल शिवसेना विभागप्रमुख युवराज दाखले यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आभार मानले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख