pimpari-NCP-agitation | Sarkarnama

आता "राष्ट्रवादी'च्या महिलाही आक्रमक; महिला सुरक्षिततेसाठी उद्या आंदोलन 

उत्तम कुटे
बुधवार, 7 मार्च 2018

महिलादिन उद्या सर्वत्र साजरा होईल. त्यानिमित्त महिलांचे कोडकौतुक होईल, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जाईल. पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र महिला यादिवशी आंदोलन करणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्या मूक आंदोलन करीत आहेत. त्याद्वारे शहरासाठीच्या लालफितीत अडकून पडलेल्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

पिंपरी : महिलादिन उद्या सर्वत्र साजरा होईल. त्यानिमित्त महिलांचे कोडकौतुक होईल, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जाईल. पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र महिला यादिवशी आंदोलन करणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी त्या मूक आंदोलन करीत आहेत. त्याद्वारे शहरासाठीच्या लालफितीत अडकून पडलेल्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

महिलादिनाच्या पूर्वसंध्येला शहर महिला राष्ट्रवादीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. तसेच महिलादिनी मूक आंदोलनही छेडले आहे. याव्दारे राष्ट्रवादीची महिला आघाडीही आता आक्रमक झाली आहे. ती सुद्धा मैदानात उतरली आहे. फादर बॉडी असलेल्या शहर राष्ट्रवादीने अगोदरच पालिकेतील सत्ताधारी भाजपविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. आता पुढील महिन्यात होऊ घातलेल्या हल्लाबोल आंदोलनाची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. युवक आणि युवती आघाडीही जोरात आहे. त्यांनीही विविध निदर्शने केली आहेत. आता पक्षाच्या महिलाही पुढे झाल्या आहेत. 

मूक आंदोलनामागील पार्श्‍वभूमी कथित करताना राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर म्हणाल्या,""गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातून महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालय करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याची सरकारने घोषणा केली. परंतु, अद्याप येथे आयुक्‍तालय सुरू होऊ शकलेले नाही. सरकार केवळ घोषणाबाजीच करीत आहे. पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये ही कचऱ्याची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार शहरातील काही भागामधून होत आहे. अशा अनेक मूलभूत प्रश्नांकडे पालिका प्रशासन व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आहे.'' 
 

संबंधित लेख