pimpari-mayor-resigns | Sarkarnama

पिंपरीच्या महापौर व दोन स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे 

उत्तम कुटे
शनिवार, 3 मार्च 2018

अपेक्षित व चर्चेतील नावे मागे पडून अचानक कुणाच्याही ध्यानीमनी नसलेले नाव पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पुढे आल्याने शहरातील राजकीय वर्तुळाला आज मोठा धक्का बसला. 

पिंपरीः अपेक्षित व चर्चेतील नावे मागे पडून अचानक कुणाच्याही ध्यानीमनी नसलेले नाव पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पुढे आल्याने शहरातील राजकीय वर्तुळाला आज मोठा धक्का बसला. 

अध्यक्षपदासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक ममता गायकवाड यांचा एकमेव अर्ज आज दाखल सत्ताधारी भाजपकडून दाखल झाला. त्यानंतर वेगाने एकामागोमाग वेगवान घडामोडी घडल्या. शहर भाजपमध्ये उभी फूट पडली. 

शहरातील भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे व स्थायीच्या अध्यक्षपदाचे दावेदार असलेले राहुल जाधव यांनी राजीनामा दिला. तसेच जुने भाजपाई असलेले स्थायीचे सदस्य शीतल शिंदे यांनीही राजीनामा सोपविला. ते सुद्धा स्थायी अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार होते. त्यामुळे तूर्त पिंपरी पालिकेत राजकीय संकट उभे राहिले आहे. दरम्यान, या निवडीतून शहराचे दादा आपणच असल्याचे जगताप तथा भाऊ यांनी दाखवून दिले आहे. 

स्थायीच्या मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे या शहराचे कारभारी असलेले जगताप यांच्या कट्टर समर्थक होत्या. गायकवाड यासुद्धा त्यांच्याच पाठीराख्या आहेत. त्यांच्या निवडीने भोसरीला अपेक्षित असलेले स्थायीचे अध्यक्षपद पुन्हा जगताप तथा भाऊ समर्थकाकडेच गेले आहे. त्यामुळे लांडगे गट प्रचंड दुखावला गेला आहे. त्या गोटात मोठी अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले आहे. त्याचा प्रत्यय महापौर आणि जाधव यांच्या राजीनाम्यातून आला. त्याचे आणखी पडसाद स्थायीच्या निवडीत उमटण्याचीही शक्‍यता आहे. 

आपण लांडगे गटाचे आहोत, ही अडचण स्थायीवर जाधव यांच्या नेमणुकीसाठी आड आल्याने पदाचा राजीनामा देत असल्याचे महापौरांनी सांगितले. तर, जुने भाजपाई व दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले शिंदे यांनी त्यांना डावलल्याने राजीनामा दिल्याचे कळते. या दोघांनी राजीनामे सभागृहनेते एकनाथ पवार यांच्याकडे दिले. मात्र,त्यांनी ते मिळाले नसल्याचे सांगितले. त्याचवेळी नाराजांची समजूत काढू,असेही ते म्हणाले. जाधव आणि शिंदे यांच्याजोडीने विलास मडिगेरी हे आणखी एक जुने भाजपाई नगरसेवक स्थायीच्या अध्यक्षपदाचे दावेदार होते. पण त्यांच्यासह शिंदे अशा दोन जुन्यांना आणि जाधव या नव्यालाही कात्रजचा घाट दाखविण्यात आला. 

आज फक्त गायकवाड यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला. निवडणूक सात तारखेला आहे. त्यादिवशी त्यांच्या निवडीची घोषणा होणार आहे. मात्र, आजच त्यांची जंगी विजयी मिरवणूक ढोलताशाच्या गजरात व गुलालाची मुक्त उधळण करीत काढण्यात आली.त्या प्रथमच निवडून आलेल्या आहेत. तसेच नुकतीच (ता.28) त्यांची स्थायी समितीवर पहिल्यांदाच निवड झालेली आहे. त्यांचे पती विनायक गायकवाड हे गेल्या टर्मला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. तसेच ते सुद्धा स्थायीचे सदस्य होते. आता त्यांच्या सौ सुद्धा स्थायीच्या सदस्याच नव्हे,तर थेट अध्यक्षच होणार आहेत. 

संबंधित लेख