pimpari-mayor-election | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड : दादांची भाऊंवर मात; नवे महापौर भोसरीचे 

उत्तम कुटे 
मंगळवार, 31 जुलै 2018

पिंपरीः उत्कंठा शिगेस पोचलेल्या पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाचा फैसला अखेर आज झाला. त्यात भोसरीने चिंचवडवर मात केली. यानिमित्ताने राहुल जाधव यांच्या रूपाने शहराला खरा ओबीसी महापौर मिळाला. भाजपमधील महापौरपदाच्या या सत्ता माळी समाजाने कुणबीवर मात केली. या निवडीतून भोसरीचे अपक्ष आमदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "गुड बुक'मध्ये असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. 

पिंपरीः उत्कंठा शिगेस पोचलेल्या पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदाचा फैसला अखेर आज झाला. त्यात भोसरीने चिंचवडवर मात केली. यानिमित्ताने राहुल जाधव यांच्या रूपाने शहराला खरा ओबीसी महापौर मिळाला. भाजपमधील महापौरपदाच्या या सत्ता माळी समाजाने कुणबीवर मात केली. या निवडीतून भोसरीचे अपक्ष आमदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "गुड बुक'मध्ये असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. 

काल मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भोसरी आमदार समर्थक नगरसेवक जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, त्याबाबत आज दुपारपर्यंत गुप्तता पाळली गेली. खुद्द जाधव यांनाही त्याची कल्पना नव्हती. तसेच दादा समर्थकही अखेरपर्यंत चिंतेत होते. पालकमंत्री गिरीश बापट यांची शिष्टाईही यासाठी कामी आली. त्यांनी दादांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे मन वळविले. त्यामुळे माळी, कुणबी वादात लेवा पाटीदार समाजाचा महापौर होता होता राहिला. या समाजाचे एकनिष्ठ भाजपाई नामदेव ढाके यांना महापौरपदाने पुन्हा हुलकावणी दिली. या पदाच्या पहिल्या निवडीच्या वेळीही ते प्रबळ दावेदार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला गेला होता. या वेळीही ढाके, दादा समर्थक जाधव तसेच संतोष लोंढे आणि भाऊ समर्थक शत्रुघ्न काटे अशी चार नावे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी काल मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली होती. त्यात जाधव यांच्यासाठी दादांनी प्रतिष्ठा पणास लावल्याने ते महापौर झाले. 

महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक येत्या शनिवारी (ता.4) होणार आहे. त्यासाठी आज अर्ज दाखल करायचे होते. ही मुदत संपता संपता जाधव यांनी महापौर,तर सचिन चिंचवडे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या व दादा समर्थकांनी मोठी गर्दी पालिकेत केली होती. पालिकेत भाजपचे बहुमत असल्याने जाधव यांच्या निवडीची औपचारिकता आता बाकी राहिली आहे. दरम्यान, पालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून महापौर व उपमहापौरपदासाठी अनुक्रमे विनोद नढे आणि विनया तापकीर यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासारखी महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणे राष्ट्रवादीने टाळले आहे. 

खडसे समर्थकाची किंमत ढाकेंना मोजावी लागली 
प्रथमच पिंपरी पालिकेत गेल्यावर्षी सत्तेत आलेल्या भाजपचे पहिले महापौर हे कुणबी असलेले नितीन काळजे झाले. त्यावेळी ते खरे ओबीसी नसल्याने या निवडीवर टीका झाली होती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले झाले होते. त्यामुळे यावेळी डुप्लिकेट ओबीसीला हे पुन्हा पद देण्याऐवजी ते खऱ्या ओबीसीला देण्याची मागणी पुढे आली होती. त्यासाठी दादा समर्थक नगरसेवक व माळी समाजाने जोरदार लॉबिंगही केले होते. ते व दादांचा इशारा कामी आला. परिणामी भाऊ समर्थक काटे यांना या बहुमानापासून दूर राहावे लागले. तर, गॉडफादर नसलेल्या ढाकेंना भोसरीतील कथित भूखंड गैरव्यवहारातून राजीनामा द्यावे लागलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक असल्याची किंमत मोजावी लागली. 

व्हायचे होते स्थायी समिती अध्यक्ष; झाले महापौर 
जाधव यांचे याअगोदर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते. त्यांना स्थायीचे अध्यक्ष व्हायचे होते. मात्र, ऐनवेळी या निवडीत भाऊंनी धक्कातंत्र वापरले. अध्यक्ष आपल्या समर्थक ममता गायकवाड यांना करून त्यांनी भोसरीवर मात केली. त्यामुळे अध्यक्ष न झालेल्या जाधव यांनी स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी महापौरपदासाठी जोरदार फिल्डींग लावली होती. त्यातून स्थायी अध्यक्ष होणाऱ्या जाधवांच्या गळ्यात महापौरांची माळ पडली, हे नसे थोडके.  

 
 

संबंधित लेख