pimpari-mayor-deputy-mayor-change | Sarkarnama

पिंपरी पालिकेचे पदाधिकारी बदलाला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदिल

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 जुलै 2018

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी बदलाला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी बदलाला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. उद्याच्या शहर दौऱ्यात त्यावर ते शिक्कामोर्तब करण्याची दाट शक्यता आहे. त्याला भाजपमधील एका पदाधिकाऱ्यानेच आज दुजोरा दिला. त्यामुळे अखेरीस गेल्या पदाधिकारी बदलाच्या गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला विराम मिळणार आहे.

क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय स्मारकाच्या भुमीपूजनासाठी मुख्यमंत्री उद्या शहरात येत आहेत. विमानतळावर स्वागत करताना पदाधिकारी बदलाबाबत ते चर्चा करणार आहेत. त्यावेळी शहर कारभाऱ्यांना ते पदाधिकारी बदलासाठी हिरवा कंदिल दाखविणार असल्याचे समजते.

महापौर, उपमहापौर आणि सभागृहनेते बदलाच्या हालचाली अंतिम टप्यात आल्या आहेत. यातील एक पदाधिकारी राजीनामा देण्यास तयार नव्हते. त्यासाठी ते गडकरी वाड्यावरही गेले होते.तसेच नुकतेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही त्यांनी दोन दिवस मुक्कामही ठोकला होता.

प्रत्येक नगरसेवकाला संधी मिळावी, यासाठी शहर कारभाऱ्यांनी पदाचा अवधी एक वर्षाचा केला आहे.त्यानुसार सर्व पदाधिकारी बदलण्यात आले आहेत.फक्त महापौर नितीन काळजे,उपमहापौर सौ.शैलजा मोरे व सभागृहनेते एकनाथ पवार बदलणे बाकी आहे. 

महापौरपद भोसरीचे भाजपचे सहयोगी आमदार महेशदादा गटाकडे आहे. बदलानंतरही ते त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी स्थायी समिती सदस्यत्वावर पाणी सोडलेले महेशदादा समर्थक राहूल जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. महापौर व सभागृहनेतेपदासाठी शर्यत असताना उपमहापौरपदासाठी,मात्र ती दिसून आलेली नाही.

या बदलात त्या पदासाठी कुणी दावेदार पुढे आलेले दिसत नाही. तर, सभागृहनेते पद हे चिंचवडचे भाजप आमदार व भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकाकडे कायम राहील, असा अंदाज आहे. मात्र,जर महापौरपद जगताप गटाकडे गेले,तर सभागृहनेतेपद लांडगे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे पदाधिकारी कोण ते लवकरच कळणार आहे.

संबंधित लेख