pimpari-maratha-reservation-bar-association | Sarkarnama

मराठा आंदोलकांवरील खटले मोफत चालविणार; पिंपरी वकील संघटनेचा निर्णय

उत्तम कुटे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तसेच या मागणीसाठी सध्या सुरु असलेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांवरील खटलेही ही वकील संघटना मोफत लढणार आहे. बारने विशेष सभा घेऊन एकमताने हा ठराव पास केला आहे. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. तसेच या मागणीसाठी सध्या सुरु असलेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांवरील खटलेही ही वकील संघटना मोफत लढणार आहे. बारने विशेष सभा घेऊन एकमताने हा ठराव पास केला आहे. 

दरम्यान चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या सात मराठा आंदोलकांची बारच्या वकिलांनी काल मोफत सेवा देऊन सुटका केली. 
 
सनदशीर मार्गाने मराठा आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाज व त्यांच्या आंदोलनाला सर्वसंमतीने पाठिंबा दिला असल्याचे बारचे अध्यक्ष अॅड राजेश पुणेकर यांनी `सरकारनामा'ला सांगितले. तसेच या आंदोलकांना मोफत कायदेशीर मदत देऊन त्यांच्या केसेस मोफत लढण्यासाठी पाच वकिलांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यात आतिश लांडगे, सुनील कड, विजय शिंदे, योगेश थंबा आणि गणेश राऊत यांचा समावेश आहे.
 
दरम्यान, 30 जुलै रोजी शहरात झालेल्या शोकसभेनंतर झालेल्या दगडफेकीप्रकरणी सातजणांना दंगलीच्या गुन्ह्यात चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्यांना काल पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलिस कोठडीही मागण्यात आली होती. ही केस समितीने आपल्या हातात घेतली. 

समितीतील अॅड. लांडगे यांनी पोलिस कोठडीला विरोध केलाच. शिवाय त्यांची न्यायालयीन कोठडी घेत नंतर त्यांची जामीनावरही सुटका केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख