pimpari-maratha-kranti-morcha-cm | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडमधील सभा उधळण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 जुलै 2018

क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता.23) होणारे भुमीपूजन आणि त्यानंतरची सभा उधळून लावण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला. त्यामुळे मुख्य़मंत्र्यांचा दौरा अडचणीत आला आहे.

पिंपरीः क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता.23) होणारे भुमीपूजन आणि त्यानंतरची सभा उधळून लावण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला. त्यामुळे मुख्य़मंत्र्यांचा दौरा अडचणीत आला आहे.

मराठा आरक्षणाची मागणी मान्य न केल्याने मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवित त्यांचा सोमवारचा दौरा होऊ देणार नसल्याचे पत्रक पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाने आज काढले. त्यामुळे अगोदरच काहीसा वादात सापडलेला हा दौरा आता आणखी अडचणीत आला आहे. 

गनिमी कावा करून मुख्यमंत्र्यांची सभा व भुमीपूजनाचा कार्यक्रम उधळण्याचा बेत मोर्चाचा दिसतो आहे. शहरात बोकाळलेले अवैध धंदे,त्याबाबत वारंवार तक्रार व आंदोलने करूनही पोलिस बंद करीत नसल्याने मुख्यमंत्र्यांचे स्वागत दारुची बाटली आणि मटक्याची चिठ्ठी व नंबर देऊन करण्यात येणार असल्याचे अपना वतन संघटनेने याअगोदरच जाहीर केले आहे. त्यात हा दुसरा इशारा आणि तो सुद्धा मराठा मोर्चाने दिल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा आता खऱ्या अर्थाने अडचणीत आला आहे.

यासंदर्भात मोर्चाने काढलेल्या इशारा पत्रकात म्हटले आहे की,लाखोंचे 58 मोर्चे काढूनही मराठा समाजाची आरक्षणाची मागणी या सरकारने मान्य केलेली नाही. त्यांनी गाजर दाखविले आहे.त्यातून हे सरकार व मुख्यमंत्री कुचकामी असल्याचे शाबीत झाले आहे. त्यामुळेच या सरकार व मुख्यमंत्र्यांविरुद्ध चार दिवसांपासून परळी येथे ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मात्र, त्याचीही दखल घेण्यात न आल्याने हे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे.

23 तारखेलाच पंढरपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा आहे.त्यावरही मराठा मोर्चाचे सावट आहे.  त्यामुळे तेथे गडबड झाली,तरी मुख्यमंत्र्यांचा पिंपरी-चिंचवड दौरा अडचणीत येऊ शकतो, अशी पोलिस सूत्रांची माहिती आहे.

संबंधित लेख