लोकसभा, विधानसभा एकत्र झाल्या, तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची अडचण 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुक राज्यात एकत्र झाली, तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची काहीशी अडचण होणार आहे. त्यांचे शहरातील दोन बलदंड आमदार हे लोकसभेला उभे राहिले, तर त्यांच्या जागी तेवढा समर्थ उमेदवार त्यांच्याकडे नाही. त्यामुळे शहरातील तिन्ही जागांवर कमळ फुलविण्याची त्यांची मनीषा पूर्ण होईल, की नाही याविषयी राजकीय जाणकार साशंक आहेत.
लोकसभा, विधानसभा एकत्र झाल्या, तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची अडचण 

पिंपरीः लोकसभा आणि विधानसभा निवडणुक राज्यात एकत्र झाली, तर पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची काहीशी अडचण होणार आहे. त्यांचे शहरातील दोन बलदंड आमदार हे लोकसभेला उभे राहिले, तर त्यांच्या जागी तेवढा समर्थ उमेदवार त्यांच्याकडे नाही. त्यामुळे शहरातील तिन्ही जागांवर कमळ फुलविण्याची त्यांची मनीषा पूर्ण होईल, की नाही याविषयी राजकीय जाणकार साशंक आहेत.

दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या, तर त्याचा भाजपला राज्य व देशात फायदा होईल, असा या पक्षाच्या धुरिणांचा तर्क आहे. मात्र, त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची उमेदवारीबाबत दोन मतदारसंघात गोची होणार आहे. त्यामुळे शत-प्रतिशत भाजप हा नारा शहरात कितपत टिकेल, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व नंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे वक्तव्य आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत ध्यानात घेतले, तर राज्यात दोन्ही निवडणूका एकत्र होण्याची शक्यता बळावलेली आहे. त्यामुळे खर्चात मोठी बचत होणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील भोसरी व चिंचवड हे दोन भाजपकडे आहेत. पिंपरी हा शिवसेनेच्या ताब्यात आहे. भोसरी व चिंचवडचे आमदार अनुक्रमे महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांची नावे लोकसभेचे उमेदवार म्हणून घेतली जात आहेत. 

शहराचा समावेश असलेल्या मावळ व शिरूर या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील आहेत. आढळराव हे तीनदा निवडून आलेले आहेत. शिरूरला त्यांचा व्यक्तिगत करिश्मा आहे. मावळमध्येही पहिल्याच डावात श्रीरंग बारणे यांनी सेंचूरी ठोकलेली आहेत. केंद्रात स्वबळावर पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने साडेतीनशे खासदारांचे टार्गेट 2019 साठी ठेवलेले आहे. त्याअंतर्गत मावळ व शिरूरमध्ये कमळ फुलविण्याचा त्यांचा विडा आहे. त्यासाठी जगताप व लांडगे या मातब्बर उमेदवारांना लोकसभेसाठी उभे करण्याच्या विचारात ते आहेत. तसे संकेत आल्याने लांडगे व जगताप यांनी तशी तयारीही सुरु केली आहे.

दादा (महेशदादा) आणि भाऊ हे विधानसभेला पुन्हा शत प्रतिशत निवडून येतील, एवढे त्यांचे नेटवर्क आणि ताकद मतदारसंघात आहे. मात्र दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या आणि हे दोघे लोकसभेला उभे राहिले, तर विधानसभेला त्यांची मोठी उणीव भासणार आहे. त्यांच्या जागी त्यांच्यासारखा हमखास निवडून येईल असा चेहरा सध्या भाजपकडे नाही. 

चिंचवडमध्ये तर तसे कुणीच नाही. भोसरीत दादांचे समर्थक असलेले पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांचे नाव घेतले जात आहे. त्याजोडीने भाऊ समर्थक पालिकेतील सभागृह नेते एकनाथ पवारही शर्यतीत आहेत. मात्र,त्यांना निवडून आणण्यासाठी पैलवान आमदार दादांनाच जोर, बैठका काढाव्या लागणार आहेत. मात्र, दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या आणि त्यात मावळमध्ये भाऊ आणि शिरूरला दादा भाजपचे उमेदवार असतील, तर विधानसभेला पक्षाची उमेदवारीसाठी पंचाईत होणार आहे. 

लोकसभेला असलेली मोदी लाट यावेळी कायम राहील, की नाही याविषयी शंका आहे. ती काहीअंशी राहिली, तरी विधानसभेला तिचा प्रभाव पडेल, की नाही हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्यावा लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com