pimpari-laxman-jagtap-bala-bhegade-bhor-vadgaon-election | Sarkarnama

आमदार बाळा भेगडेंची दोन पावले मागे, तर आमदार लक्ष्मणभाऊ जगतापांचे एक पाऊल पुढे

उत्तम कुटे
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे जिल्ह्यातील भोर नगरपालिका आणि नवनिर्मित वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या निवडणूक निकालामुळे भाजपच्या एका आमदारांचे वजन वाढले. त्याचवेळी दुसऱ्यांचे,मात्र कमी झाले आहे. 

पिंपरीः नुकत्याच झालेल्या पुणे जिल्ह्यातील भोर नगरपालिका आणि नवनिर्मित वडगाव-कातवी नगरपंचायतीच्या निवडणूक निकालामुळे भाजपच्या एका आमदारांचे वजन वाढले. त्याचवेळी दुसऱ्यांचे,मात्र कमी झाले आहे. 

भाजपचे मावळचे आमदार बाळा भेगडे यांची या निकालांमुळे दोन पावले जिल्हाध्यक्ष म्हणून मागे पडली आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मंत्रिपदासाठी एक पाऊल पुढे गेले आहे.

भेगडेंना आपल्या होमपीचवर चांगली बॅटिंग करता आली नाही. त्यामुळे मावळच्या बालेकिल्यातच भाजपला पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. 

मावळमधून भेगडे सलग दोनदा निवडून आलेले आहेत. ही नगरपंचायत होण्यापूर्वी वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीत भाजप सत्तेवर होती. ही सत्ता भेगडेंना राखता आली नाही. तर, त्याचवेळी जिल्ह्यातसुद्धा त्यांना व पर्यायाने पक्षाला दुसरा पराभव पहावा लागला.

गल्ली ते दिल्ली सत्ता असलेल्या भाजपला भोर नगरपालिकेत साधे अस्तित्वही दाखविता आले नाही. तेथे पिंपरी-चिंचवडचे दमदार आमदार महेशदादा लांडगे प्रचाराला जाऊनही भाजपचा सुपडा साफ झाला. 
कॉंग्रेसने व त्यातही या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे व भोरचे आमदार त्यांचे पूत्र संग्राम थोपटे यांनी आपल्या बालेकिल्यात भाजपला साधा चंचूप्रवेशही करू दिला नाही. 

सर्वच्या सर्व 17 जागा आणि नगराध्यक्षही कॉंग्रेसने निवडून आणला. त्यामुळे दहा महिन्यावर आलेली लोकसभा व त्यानंतर चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा पराभव भाजपला अडचणीचा ठरणारा आहे. तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून भेगडेंना तो दोन पावले मागे घेऊन जाणारा ठरला आहे. या पराभवाने त्यांना धोक्याची घंटा वाजविली आहे. 

राज्याच्या शेवटच्या मंत्रीमंडळ विस्तारातून त्यांचे नाव आता कटाप होणार आहे. परिणामी या शर्यतीत असलेले भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार जगताप यांचे एक पाऊल पुढे पडले आहे. ते सलग तीन टर्म आमदार आहेत. पिंपरी पालिकेत पक्षाची सत्ता आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच 2019 चे लोकसभा व विधानसभेचे गणित विचारात घेता मंत्रीपदाची लॉटरी जगताप यांना लागू शकते, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.

मावळमधून कुणाचीही आमदारकीची हॅटट्रिक झालेली नाही, हा या मतदारसंघाचा इतिहास आहे. कुणाही पक्षाने तेथून एकाच व्यक्तीला सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली नाही. हा इतिहास जमेस धरला,तर भेगडेंना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी भेटेल का याविषयी साशंकता आहे. 

भोर आणि वडगावच्या पराभवाने ही शंका आणखी गडद झाली आहे. परिणामी हॅटट्रिक करू न देण्याचा आपला रेकॉर्ड मावळ कायम ठेवते का हे पुढील वर्षीच कळणार आहे.
 

संबंधित लेख