pimpari-landge-jagtap-jadhav | Sarkarnama

पिंपरीच्या "स्थायी'च्या अध्यक्षपदाचे दावेदार राहुल जाधवच 

उत्तम कुटे
शुक्रवार, 2 मार्च 2018

श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खजिन्याच्या चावीचा टर्न असल्याने आमदार महेश लांडगे गट आता हातघाईवर आला आहे. त्यातूनच त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राहुल जाधव हे आपले समर्थकच खरे दावेदार असल्याची भूमिका घेतली आहे. 

पिंपरीः श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खजिन्याच्या चावीचा टर्न असल्याने आमदार महेश लांडगे गट आता हातघाईवर आला आहे. त्यातूनच त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राहुल जाधव हे आपले समर्थकच खरे दावेदार असल्याची भूमिका घेतली आहे. 

राहुल जाधव आणि विलास मडिगेरी यांच्यात तीव्र चुरस निर्माण झाली आहे. भाजपच्या जुन्या गटाकडून नगरसेवक मडिगेरी यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. तर, आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाचे खरे दावेदार राहुल जाधव हेच आहेत, अशी भूमिका त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी घेतली आहे. 

दोन दिवसांपूर्वी पदउतार झालेल्या स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे या लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघातीलच आहेत.त्या शहराचे कारभारी आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर पाठीराख्या आहेत. त्यामुळे स्थायीचे अध्यक्षपद आता लांडगे गटाकडे जाणार आहे. त्यासाठी जाधव हे त्यांचे एकमेव समर्थक शर्यतीत आहेत. ते भोसरी मतदारसंघातलेच आहेत. तर, त्यांचे अध्यक्षपदासाठीचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले विलास मडिगेरी हे सुद्धा भोसरीकरच आहेत. तिसरे दावेदार शीतल शिंदे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक आहेत. मात्र, खरी स्पर्धा मडिगेरी व जाधव अशीच आहे. त्यामुळे हे पद कोणालाही मिळाले,तरी ते पुन्हा भोसरीकडेच जाणार आहे.फक्त ते नव्या (जाधव) की जुन्या (मडिगेरी) नगरसेवकाला मिळते, हाच काय तो प्रश्‍न आहे. 

या निवडीबाबत आमदार लांडगे गटाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जुन्या नगरसेवकांना पदे दिली नसल्याचा दावा खोडून काढला आहे.""जुने फक्त सात नगरसेवक निवडून आले आहे. त्यातील पाचजणांना पहिल्याच वर्षी मोठी व महत्वाची पदे देण्यात आली आहेत. त्यात उपमहापौर शैलजा मोरे, सभागृहनेते एकनाथ पवार, प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे,स्थायी समिती सदस्य उत्तम केंदळे आणि विधी समिती सभापती शारदा सोनवणे यांचा समावेश आहे. त्याजोडीने माऊली थोरात आणि मोरेश्वर शेडगे या जुन्या भाजपाईंनाही स्वीकृत नगरसेवकपद दिले गेले आहे. त्यामुळे आता स्थायी अध्यक्षपदाचे खरे दावेदार समाविष्ट गावातील जाधव हेच आहेत. ग्रामीण भागातील पक्षाचा चेहरा म्हणून ते ओळखले जातात. भोसरी मतदारसंघात माळी समाजाचे मोठे प्राबल्य असून जाधव हे माळी समाजाचे आहेत. आगामी निवडणुकीत त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. जाधव यांनी आमदार लांडगे यांना खंबीर साथ दिली आहे. महापौर नितीन काळजे आणि नगरसेवक राहुल जाधव हे पहिल्यापासून आमदार महेश लांडगे यांच्यासोबत आहेत. त्यांनी दादांच्या सांगण्यानुसार भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे दादांसोबत आलेल्या नगरसेवकांना पदे देणे गरजेचे आहे. त्यामुळे जाधव यांच्या नावाचा पक्ष विचार करेल'' 

पिंपरी पालिकेत आमदार जगताप आणि आमदार लांडगे यांच्यामध्ये भाजपची सत्ता आली आहे. ती येताच त्यांच्यात राजकीय फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार महापौर सव्वा वर्षानंतर बदलला जाणार आहे. विद्यमान महापौरांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. ते भोसरीतील लांडगे समर्थक नितीन काळजे आहेत. त्यामुळे आगामी महापौर हा चिंचवड विधानसभा मतदार संघातील जगताप यांचा पाठीराखा होईल. सध्या स्थायी समिती अध्यक्षा या जगताप समर्थक असल्याने ते पद आता लांडगे समर्थकाला देण्यात येणार आहे. 
 

संबंधित लेख