pimpari-landage-workers-resignation | Sarkarnama

पिंपरी-चिंचवड भाजपमधील लांडगे समर्थकांचे राजीनामा सत्र सुरूच 

उत्तम कुटे
रविवार, 4 मार्च 2018

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीवरून शहर भाजपमध्ये निर्माण झालेला पेच आणि फूट आणखी वाढत चालली आहे. शहराचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकाचा स्थायी अध्यक्षपदी टर्न असूनही ते त्यांना न दिल्याने दादांच्या पाठीराख्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरवात केली आहे. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीवरून शहर भाजपमध्ये निर्माण झालेला पेच आणि फूट आणखी वाढत चालली आहे. शहराचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकाचा स्थायी अध्यक्षपदी टर्न असूनही ते त्यांना न दिल्याने दादांच्या पाठीराख्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरवात केली आहे. 

महापौर नितीन काळजे,स्थायी सदस्य राहुल जाधव यांच्यापाठोपाठ क्रीडा समिती लक्ष्मण सस्ते यांनीही आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच पिंपरीतील तिढ्यात लक्ष घालणार आहेत. ते लांडगेंशी उद्या याबाबत मुंबईत प्रत्यक्ष बोलणार असल्याचे समजते. 

दरम्यान, नाराजांची समजूत पक्ष काढेल आणि पिंपरी भाजपमधील पेचप्रसंग निश्‍चित निवळेल, असा विश्‍वास शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनीही व्यक्त केला आहे. काळजे आणि जाधव यांच्या राजीनाम्यानंतर पालिकेतील सभागृहनेते एकनाथ पवार यांनीही नाराजांची समजूत काढण्यात येईल, असे कालच सांगितले होते. 

सस्ते यांनी आपला राजीनामा लांडगे यांच्याकडे दिला आहे. पुढे काय याबाबत दादाच काय तो निर्णय घेतील,असे ते यासंदर्भात म्हणाले. जाधव यांना स्थायी अध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याची खंत त्यांच्या बोलण्यातून दिसला. दादा समर्थक इतर पदाधिकाऱ्यांनीही आपले राजीनामे दादांकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपमधील हा तिढा वाढला आहे. सुप्त गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 

दुसरीकडे लांडगे यांनी या प्रकरणावर सूचक मौन बाळगले आहे. कालच्या पालिकेतील या राजकीय नाट्याच्या वेळी फक्त जगताप हजर होते. लांडगे यांना ऍसिडिटीचा त्रास गेले काही दिवस जाणवत होता. त्यात दगदगीमुळे तो आणखी तीव्र झाला. त्यामुळे कालच त्यांना काही तासांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले होते. रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

स्थायी अध्यक्ष निवडणूक व माझी तब्येत बिघडणे हा निव्वळ योगायोग होता, असे त्यांनी आज सांगितले. कोणी कसलाही गैरसमज करून घेऊ नये आणि भोसरी व्हीजन 2020 कडे वाटचाल करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

एकूणच पालिका सभागृहनेते आणि शहराचे मुख्य कारभारी भाऊ यांची प्रतिक्रिया आणि त्यानंतर दादांचे वक्तव्य यातून भाजपमधील फूट व पेच हा पेल्यातील वादळ ठरणार असल्याचे दिसते. सव्वा वर्षावर आलेली लोकसभा आणि या निवडणुकीचे दादा व भाऊ हेच संभाव्य उमेदवार असल्याने दादा हे आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढतील, येत्या दोन दिवसांत असा अंदाज आहे. तर, दादांची समजूत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षच काढणार असल्याने स्थायी समिती अध्यक्ष निवडीची औपचारिक घोषणा सात तारखेला होण्याच्या आतच शहर भाजपमधील ही गटबाजी आणि वावटळ शमण्याचे संकेत मिळाले आहेत. 

संबंधित लेख