pimpari-landage-jagtap | Sarkarnama

पिंपरीत भाऊंची दादांवर मात

उत्तम कुटे
बुधवार, 7 मार्च 2018

श्रीमंत पिंपरी पालिकेच्या खजिन्याची चावी दुसऱ्यांदा आपल्या गटाकडेच ठेवण्यात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे बाजीगर ठरले. आमदार महेश लांडगे गटाचे प्रयत्न व मुत्सद्देगिरी तोकडी पडली. तसेच दुसऱ्यांदा मागासवर्गीय महिलेला यापदी संधी देऊन भाजपने आपल्याला हवा तो संदेशही दिला. या निवडीमागे आगामी विधानसभा निवडणुकीचे व त्यातही पिंपरी विधानसभेचे बेरेजेचे राजकारण दडलेले आहे. 

पिंपरी : श्रीमंत पिंपरी पालिकेच्या खजिन्याची चावी दुसऱ्यांदा आपल्या गटाकडेच ठेवण्यात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे बाजीगर ठरले. आमदार महेश लांडगे गटाचे प्रयत्न व मुत्सद्देगिरी तोकडी पडली. तसेच दुसऱ्यांदा मागासवर्गीय महिलेला यापदी संधी देऊन भाजपने आपल्याला हवा तो संदेशही दिला. या निवडीमागे आगामी विधानसभा निवडणुकीचे व त्यातही पिंपरी विधानसभेचे बेरेजेचे राजकारण दडलेले आहे. 

विधानसभेच्या पिंपरी राखीव मतदारसंघातून भाजपनेच लढण्याची तयारी सुरू केली आहे. तेथे आपल्या समर्थकालाच तिकीट देण्याचा भाऊंचा विचार आहे. त्यासाठीच हे पद लांडगे गटाचा टर्न असूनही त्यांनी पुन्हा आपल्याकडेच ठेवल्याचा राजकीय जाणकारांचा होरा आहे. ही निवड व निवडणूक त्यांनी आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न केली होती. त्यामुळेच विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सोडून ते सोमवारपासून येथे तळ ठोकून होते. 

"स्थायी'चे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवून आपणच शहराचे दादा असल्याचे भाऊंनी दाखवून दिले. त्याजोडीने सभागृहनेते अशी दोन्ही महत्त्वाची पदे आपल्याकडे ठेवण्यात सलग दुसऱ्या वर्षी त्यांना यश आले आहे. 

पुढील वर्षी लोकसभा, विधानसभेचीही निवडणूक आहे. त्याची तयारी म्हणून पालिकेची सूत्रे आपल्याकडेच भाऊंनी ठेवली आहे. लांडगे यांच्या गटाकडे, फक्त प्रतिष्ठेचे परंतु शोभेचे असे अकार्यकारी महापौरपद आहे. ममता गायकवाड यांचे पती विनायक हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व स्थायीचे माजी सदस्य होते. ते भाऊंचे कट्टर समर्थक आहेत. 

स्थायी अध्यक्षपदासाठी राहुल जाधव (लांडगे गट) की विलास मडिगेरी वा शीतल शिंदे (जुने भाजपाई) अशा दोघांच्या भांडणात जशी ऐनवेळी आपल्या समर्थकाला (गायकवाड) संधी देऊन भाऊंनी जशी संधी साधली, तशीच भाजप, आरपीआयच्या पिंपरीच्या जागेच्या भांडणात भाजपकडून पिंपरीचे उमेदवार म्हणून ऐनवेळी विनायक गायकवाड हे उभे राहिले, तर आश्‍चर्य वाटणार नाही. त्यासाठीच स्थायी अध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नीला मौका दिल्याची चर्चा आहे. 

विधानसभेला शहरातील तीनपैकी उमेदवारीची सर्वाधिक चुरस आणि संघर्ष पिंपरी मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. येथे भाजपचे एकापेक्षा अधिक दावेदार आहेत. आमदार जगतापांचे पक्षांतर्गत विरोधक खासदार अमर साबळे यांच्या कन्या वेणू या पिंपरीतून इच्छुक आहेत. त्यामुळे जगताप यांनीही आपला समर्थक येथून उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

स्थायीचे अध्यक्षपद त्यासाठीच त्यांनी आपल्याकडेच राखले आहे. त्यातून ते वर्षभरात शहरातील भोसरी व चिंचवडपेक्षा पिंपरीत तुलनेने अधिक कामे करण्याची शक्‍यता आहे. स्थायीच्या मावळत्या अध्यक्षा सीमा सावळे यांची, तर गेल्या विधानसभेपासून पिंपरीतून इच्छुक आहेत. त्यावेळी त्यांची संधी हुकली. त्यामुळे यावेळी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपकडून त्यांना तिकीट मिळाले नाही, तर त्या शिवसेनेकडून उभ्या राहतील, असा अंदाज आहे. 

संबंधित लेख