pimpari-kate-leader-opposition | Sarkarnama

पिंपरीत नवीन विरोधी पक्षनेते म्हणून नाना काटेंचे नाव ? 

उत्तम कुटे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

पिंपरी -चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी आपला राजीनामा गेल्या महिन्यातच अजित पवार यांच्याकडे स्वतःहून दिल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेत्याची वर्षभरातच उचलबांगडी? असे वृत्त 15 फेब्रुवारीलाच "सरकारनामा'ने दिले होते. ते खरे ठरले आहे. स्वपक्षातूनच निष्क्रीयतेचे आरोप झाल्यानंतर बहल यांनी स्वतःच राजीनामा दिल्याचे कळते. दरम्यान, त्यांच्याजागी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांची नियुक्तीची घोषणा पुढील महिन्यात होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

पिंपरीः पिंपरी -चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी आपला राजीनामा गेल्या महिन्यातच अजित पवार यांच्याकडे स्वतःहून दिल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. पिंपरी पालिकेतील विरोधी पक्षनेत्याची वर्षभरातच उचलबांगडी? असे वृत्त 15 फेब्रुवारीलाच "सरकारनामा'ने दिले होते. ते खरे ठरले आहे. स्वपक्षातूनच निष्क्रीयतेचे आरोप झाल्यानंतर बहल यांनी स्वतःच राजीनामा दिल्याचे कळते. दरम्यान, त्यांच्याजागी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांची नियुक्तीची घोषणा पुढील महिन्यात होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत खांदेपालट होणार असल्याचे संकेत पक्षाचे माजी आमदार विलास लांडे यांनी याच महिन्यात 15 तारखेला दिले होते. विरोधी पक्षनेत्याची आपली भूमिका व्यवस्थित पार पाडत नसल्याने बहल यांची वर्षभरातच उचलबांगडी करणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. पक्षातील घरभेद्यांची अजित पवारांनी गंभीर दखल घेतली असून अशा सूर्याजी पिसाळांवर त्यांच्यामार्फत कारवाई करू, असेही ते त्यावेळी म्हणाले होते. 

दरम्यान, पालिकेतील सत्ताधारी भाजपचे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांचे राजीनामे वर्षभरातच घेण्यात येणार आहे. या महिन्यात मुदत संपल्याने "स्थायी'ला नवीन अध्यक्षांसह आठ सदस्यही पुढील महिन्यात मिळणार आहेत. त्यांच्या जोडीने इतर पदाधिकारीही बदलण्याचे वारेही पक्षात वाहू लागले आहे. त्यामुळे भाजपच्या पालिकेतील सत्तेला वर्ष पूर्ण झाल्यानंतर सत्ताधारी पदाधिकारी आणि विरोधी पक्षनेता अशी नवी टीम पालिकेला आता मिळणार आहे. नवीन विरोधी पक्षनेते म्हणून नाना काटे प्रबळ दावेदार आहेत. राष्ट्रवादीच्या इतर दोघा नगरसेवकांचीही नावे त्यासाठी घेतली जात असली, तरी काटे यांचे पारडे जड असल्याचे संकेत मिळाले आहेत. 
 

संबंधित लेख