पिंपरीचे कारभारी भाऊ लागले निवडणुकीच्या तयारीला

पिंपरी-चिंचवड शहर व पर्यायाने येथील महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा असलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना 2019 चे वेध आताच लागले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यावेळच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे.
पिंपरीचे कारभारी भाऊ लागले निवडणुकीच्या तयारीला

पिंपरीः पिंपरी-चिंचवड शहर व पर्यायाने येथील महापालिकेत भाजपची प्रथमच सत्ता आणण्यात सिंहाचा वाटा असलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांना 2019 चे वेध आताच लागले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यावेळच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. 

त्याचाच भाग म्हणून त्यांनी शहरातील काही नाराजांची नाराजी दूर केली आहे. त्याचवेळी पक्षाला व पालिकेतील कारभाराला वादात आणणाऱ्या पदाधिकाऱ्यांना चार हात दूर ठेवण्याची खबरदारी त्यांनी आतापासूनच घेण्यास सुरवात केली आहे.

2014 ला जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर, त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या पालिका निव़़डणुकीअगोदर राष्ट्रवादीचे दुसरे सरदार व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी गेल्यावर्षी पालिकेत भाजपची सत्ता आणली. पर्यायाने त्यांच्याबरोबर भाजपमध्ये आलेल्या त्यांच्या समर्थकांना पालिकेतील सत्तेत वाटा मिळाला. त्यामुळे जुने भाजपाई नाराज झाले. त्यातून शहरात जुना व नवा असा सुप्त संघर्ष सुरु झाला. तो 2019 चे पक्षाचे व त्यातही राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे लक्ष्य ध्यानात घेता परवडणारा नव्हता. हे पक्ष चाणक्याच्या लक्षात आले. त्यामुळे गेले वर्षभर जुन्यांना दूर ठेवणाऱ्या शहर भाजपने आता त्यांना जवळ करण्यास सुरवात केली आहे. 

शहर सरचिटणीस अमोल थोरात यांना शहर पक्षप्रवक्ते केल्याने त्याला दुजोरा मिळाला आहे. इतरही नाराज महाराजांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातील काहींना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे. काहींना भविष्यात त्यापेक्षा महत्वाचे पद देण्याचे आश्वासन दिले गेले आहे.

शहरात भाजपची सत्ता आल्याने जगताप तथा भाऊ हे शहराचे दादा तथा कारभारी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी 2019 च्या तयारीच्या जोडीने शहरातही बारीक लक्ष घालण्यास आता सुरवात केली आहे. प्रशासनाकडून ते प्रलंबित कामांचा आढावा घेत आहेत. खर्चात काटकसरीच्या सुचना देत आहेत. विकासकामांच्या सल्लागार नियुक्तीवर होणारा वायफळ खर्च त्यांनी बंद केला आहे. या नियुक्त्या वादात सापडल्या होत्या. 

पक्षाला अडचणीत आणणारे व विरोधकांच्या हातात आयते कोलीत देणारे पक्षाचे व पालिकेतील वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना भाऊंनी आता सुरक्षित अंतर दूर ठेवण्यास दूर ठेवण्यास सुरवात केली आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चर्चेत असलेले भाऊ आमदारकीची हॅटट्रिक करण्यास सज्ज आहेत. त्याचवेळी आपले कट्टर शत्रू आणि मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा गड काबीज करण्याचेही त्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे 2019 ला मावळमधून लढण्याच्या तयारीतही ते आहेत. ते लोकसभेला लढले,तरी शहराचे दादापण आणि पक्षाचे शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदारपदाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी त्यांच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात त्यांना पुन्हा कमळच फुलवावे लागणार आहे. त्याचीच बांधणी म्हणून ते आतापासून तयारीला लागले आहेत. म्हणून आपल्या रांगड्या व स्वाभिमानी स्वभावाला काहीशी मूरड घालून तडजोडी करायला लागले आहेत. मुत्सद्देगिरीपणाच्या प्रत्यय देणाऱ्या काही चालीही खेळू लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com