आयपीएस कृष्णप्रकाश ठरले पहिले अल्ट्रामॅन

`अल्ट्रामॅन' स्पर्धेसाठी पात्र ठरणे हीच मुळात मोठी अचिव्हमेंट असते. मात्र, दृढ निश्चय आणि एकच ध्यास याच्या जोरावर या स्पर्धेसाठी नुसता पात्रच ठरलो नाही, तर विक्रमी वेळेत ती पूर्ण करीत जिंकलीसुद्धा! आपल्या देशासाठी; तसेच गणवेशातील व सरकारी भारतीय कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत अभिमानस्पद बाब आहे.- कृष्णप्रकाश, विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा)
आयपीएस कृष्णप्रकाश ठरले पहिले अल्ट्रामॅन

पिंपरीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाळीशी गाठलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना दिलेले फिटनेसचे आव्हान विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) कृष्णप्रकाश यांनी यशस्वी पेलले आहे. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी जगातील सर्वात खडतर अशी ट्रायथलॉन स्पर्धा जिंकून अल्ट्रामॅन हा किताब पटकावला. ऑस्ट्रेलिया येथे नुकतीच ही स्पर्धा झाली. ती जिंकणारे ते देशाच्या नागरी सेवेतील आणि वर्दीतील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. जगातील फक्त 44 जणांनाच हा बहुमान मिळालेला आहे.

ऑगस्ट 2017 मध्ये `आयर्नमॅन' हा किताबही कृष्णप्रकाश यांनी मिळविलेला आहे. हा आणि अल्ट्रामॅन असे दोन्ही पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय आहेत. यापूर्वी मॉडेल असलेला मिलिंद सोमण याने (34तास 49 मिनिटे) अल्ट्रामॅन हा पुरस्कार मिळविलेला होता. मात्र, त्यांच्यापेक्षा कमी वेळ नोंदवून (34 तास 21 मिनिटे) त्यांचे रेकॉर्ड मोडून कृष्णप्रकाश यांनी नवा विक्रम केला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे ट्रायथलॉन ही पोहणे, धावणे आणि सायकलिंग अशा तीन प्रकारांतील स्पर्धा जिंकून अल्ट्रामॅन होणारे केपी (कृष्णप्रकाश यांचे पोलिस दलातील टोपण नाव) यांना या स्पर्धेअगोदर सात महिने जीवघेणा अपघात पुणे-गोवा सायकल स्पर्धेदरम्यान झाला होता. त्यातून काही महिन्यात उभारी घेऊन त्यांनी हा जागतिक विक्रम केला, हे विशेष.

कृष्णप्रकाश यांच्या या यशात पुण्याचाही वाटा आहे. त्यांचा ट्रायथलॉनचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुण्याचे ट्रायथलॉन प्रशिक्षक कौस्तुभ राडकर यांनी दिले. तसेच त्यांनी मानसलेक, पिरंगुट येथे पोहण्याचा सराव केला होता. मुंबई-पुणे असा रात्री एक वाजता ते सायकलिंगचा सराव करीत होते. वरिष्ठ आणि कनिष्ठांच्याही सहकाऱ्यांचाही कृष्णप्रकाश यांनी आवर्जून उल्लेख केला.

केपी मूळचे झारखंडचे. ते 1998 च्या महाराष्ट्र आयपीएस बॅचचे आहेत. मालेगाव, बुलढाणा, नगर, मुंबई आणि गडचिरोलीत त्यांनी यापूर्वी काम केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. 

अल्ट्रामॅन स्पर्धेविषयी केपी म्हणाले, की तीन दिवस ती चालते. पहिल्या दिवशी प्रशांत महासागरात 10 किलोमीटर पोहणे आणि घाट रस्त्यावर १४६.१ किलोमीटर चढउतार करणे, तर दुसऱ्या दिवशी घाट रस्त्यावर २७५ कि. मी. चढउतार, तर शेवटच्या दिवशी ८४.४ कि.मी. धावणे हे विशिष्ट वेळेत पूर्ण करावे लागते. सायकलिंग करताना 14 किलोमीटरवर सायकलचा ब्रेक निकामी होऊन पडलो व जखमी झालो. तरीही सायकलिंग वेळेत पूर्ण केले.

वीरप्पनने उद्युक्त केले अल्ट्रामॅन स्पर्धेसाठी 
प्रसिद्ध चंदन तस्कर वीरप्पन याच्यामुळे केपी अल्ट्रामन स्पर्धेसाठी उद्युक्त झाले, हे सांगितले, तर आश्चर्य वाटेल. पण ते खरे आहे. वीरप्पनला मारणारे के. विजयकुमार या एसटीएफच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या वीरप्पन या पुस्तकात 52 वर्षीय वीरप्पन हा 25 वर्षाच्या तरुणाएवढा फीट होता. तेवढी ऊर्जा त्याच्यात होती, असा उल्लेख आहे. हे वाचून गुन्हेगार एवढा फीट राहू शकतो, तर पोलिस का नाही या प्रश्नाने भंडावून सोडले आणि या स्पर्धेसाठी उद्युक्त झालो, असा अनुभव केपींनी सांगितला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com