pimpari-election-Jagtap | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडचे कारभारी लागले कामाला 

उत्तम कुटे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

लोकसभा व विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने पिंपरी-चिंचवडचे कारभारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे आता अंग झाडून कामाला लागले आहेत.

पिंपरी : लोकसभा व विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने पिंपरी-चिंचवडचे कारभारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे आता अंग झाडून कामाला लागले आहेत.

वर्षभरानंतरही न झालेल्या कामांबद्दल त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची झाडाझडती शनिवारी (ता.24) घेतली. त्यानंतर लगेचच त्यांनी पिंपरी-चिंचवडकरांच्या विजेच्या संबंधातील अडचणींबाबत राज्य वीज कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना काल (ता.25) धारेवर धरले.

आपल्या चिंचवड मतदारसंघापुरते नव्हे, तर संपूर्ण शहराच्या सर्वसामान्यांशी निगडीत प्रलंबित कामांत आणि प्रश्‍नांत भाऊ (जगताप) लक्ष घालू लागले आहेत. त्यातून लोकसभेची तयारी त्यांनी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. 

पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रबळ दावेदार म्हणून भाऊंकडे पाहिले जात आहे. त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आणि मावळचे विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जवळपास नक्की झाली आहे. त्यांच्याकडूनच गत लोकसभेला जगताप यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्याचे उट्टे काढण्याच्या विचारात भाऊ आहेत.

आपला मतदारसंघ सोडून मावळमध्ये मोडणाऱ्या पिंपरीसह भोसरी या शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील प्रश्‍नांत आता त्यांनी लक्ष घालण्यात सुरवात केली आहे. त्यातूनच त्यांनी गेल्या शनिवारी संपूर्ण शहरातील पालिकेशी निगडीत प्रलंबित कामांचा आढावा घेतला. तसेच अनेक सूचना केल्या.

आपल्या पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांनी केल्याने प्रशासनाला त्यांनी खर्चात काटकसर करण्याची सूचना काल केली. कुठे वायफळ खर्च होत आहे, हे त्यांनी दाखवून दिले. तसेच कुठे बचत करता येईल,हे सुद्धा सांगितले. 

शहरात विजेची संबंधित अनेक समस्या आहेत. अद्याप शहरात सर्व वीजवाहिन्या भूमिगत झालेल्या नाहीत. स्विचिंग स्टेशन कार्यान्वित नाहीत. विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. गुरुवारखेरीज इतर दिवशीही विजेचा लपंडाव सुरू असतो.

महावितरणाच्या स्थानिक कार्यकारी अभियंत्यांऐवजी त्यांनी थेट पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्याबरोबर मॅरेथॉन बैठक घेतली. त्यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. त्यांनी नेहमीची ठराविक साचेबंद सरकारी उत्तरे दिली. मात्र, ती जगताप यांनी ताडून पाहिली. नंतर या अर्धवट व चुकीच्या उत्तराबद्दल असमाधान व्यक्त केले. वेळकाढूपणा केल्याबद्दल वीज अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. 

शहरातील सर्व वीजवाहिन्या भूमिगत केल्याचा वीज कंपनीचा दावा त्यांनी खोडून काढला. अनेक ठिकाणी त्या झाल्या नसून झालेल्या कार्यान्वित नसल्याचे त्यांनी दाखवून दिले.

इन्फ्रा दोन अंतर्गत वेळेत कामे न केलेल्या ठेकेदारांवर तसेच अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी त्यांनी केली. तसेच पूर्ण माहिती घेऊन दुसरी बैठक घेणार असल्याचे खडसावत या बैठकीची वेळ आणि तारीख दोन दिवस अगोदर कळवा, असे राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावण्यासही ते विसरले नाहीत.

संबंधित लेख