पिंपरीत आता कचरा वाहतुकीत 125 कोटींच्या घोटाळ्याचा संशय

सव्वाचारशे कोटी रुपयांच्या रस्ते कामानंतर आता साडेचारशे कोटी रुपयांच्या कचरा वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेतही पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे.
पिंपरीत आता कचरा वाहतुकीत 125 कोटींच्या घोटाळ्याचा संशय

पिंपरीः सव्वाचारशे कोटी रुपयांच्या रस्ते कामानंतर आता साडेचारशे कोटी रुपयांच्या कचरा वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेतही पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. 

रस्ते कामातील नव्वद कोटी रुपयांच्या नुकसानीला सत्ताधारी भाजप व त्यातही स्थायी समितीच्या जोडीने आयुक्तही जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्या शहरातील दोन्ही खासदारांनी केला होता. त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली आहे. 
आता राष्ट्रवादीने आयुक्तांना लक्ष्य केले आहे. कचरा वाहतुकीच्या कामात सव्वाशे कोटी रुपयांवर डल्ला मारला जाणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. 

दरम्यान, कुठल्याही पुराव्याशिवाय हे आरोप करण्यात आले असून या कामाची निविदा प्रक्रिया योग्यरीतीने पार पाडल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. फक्त दहा महिन्यांतच सत्ताधाऱ्यांएवढेच आयुक्तांवरही आरोप झाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातून त्यांची बदली होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. 

पिंपरी पालिकेच्या समाविष्ट गावातील रस्ते बांधणीच्या कामात जादा रकमेच्या निविदा मंजूर केल्याने पालिकेला नव्वद कोटी रुपयांचा भुर्दंड बसल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व श्रीरंग बारणे यांनी केला होता. त्यात सत्ताधारी भाजपचे शहरातील दोन्ही आमदार व त्यांचे पालिकेतील पदाधिकारी आणि आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याबाबत भाजपचे खासदार अमर साबळे यांनीही तक्रार दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची चौकशी लावली आहे. ती सुरू होत नाही, तोच आयुक्तांवर नवा आरोप लागला आहे. आता तो पालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने केला आहे. 

कचरा वाहतुकीत करदात्यांच्या पैशाची नाहक लूट होत असून त्यासाठी हर्डीकर हे भाजपला सहकार्य करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे. या लुटीतील हिश्‍याचेही आयुक्त भागीदार असू शकतात, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांच्या दबावाला आयुक्त बळी पडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

शितोळे म्हणाले, की कचरा वाहतुकीत पैशाचा नाहक अपव्यय होत असल्याने तो थांबविण्यासाठी शहरातील खासदार, मुख्यमंत्री आणि पीएमओकडेही तक्रार केली आहे. त्यांच्याकडून या विषयी महाराष्ट्र शासनास आदेश देण्यात आले आहेत. या विषयाला आक्षेप घेऊनही आयुक्तांनी त्याला सहमती देऊन मंजुरीसाठी तो स्थायीपुढे ठेवलेला आहे. पुणे पालिकेच्या तुलनेत पिंपरीत प्रती टन कचरा वाहतुकीला जादा दर देण्यात आला आहे. तसेच आपल्या पाच वर्षाच्या नाही, तर आठ वर्षासाठी हे काम देण्याचा घाट भाजपने घातला आहे, हे आश्‍चर्यजनक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com