pimpari-congress-corruption | Sarkarnama

पिंपरी पालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची कॉंग्रेसची मागणी 

उत्तम कुटे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करू, असे कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. 

पिंपरीः भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करू, असे कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, याप्रकरणी शिवसेनेने अगोदरच आवाज उठविला आहे. त्यानंतर एकही सदस्य पालिकेत नसलेल्या कॉंग्रेसने ती केली आहे. शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्याने पिंपरी पालिकेतील तीन कथित भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत अगोदरच लावलेली आहे. वर्षभरात लोकसभा, तर दीड वर्षाने विधानसभा निवडणूक असल्याने कॉंग्रेसने आता ऍक्‍टिव्ह मोडवर यायचे ठरविले असल्याचे या मागणीतून स्पष्ट होत आहे. 

पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल विखे-पाटील यांची मुंबईत भेट घेतली. कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर सरचिटणीस क्षितिज गायकवाड, एनएसयूआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बाळासाहेब साळवे आदींचा त्यात समावेश होता. 

पिंपरी चिंचवड पालिकेतील गैरकारभाराविषयी माहिती देणारे निवेदन साठे यांनी विखे पाटील यांना यावेळी दिले. या निवेदनात प्रस्तावित पाणीपट्टीवाढ, कचरा उचलण्याच्या निविदेतील भ्रष्टाचार, टीडीआर आणि पंतप्रधान आवास योजना निविदेतील भ्रष्टाचार याबाबत माहिती देण्यात आली आहे. 

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरबांधणी प्रकल्पांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. रस्ते विकासासाठी तब्बल 425 कोटी रुपयांच्या कामात सत्ताधारी भाजपने सुमारे 45 कोटींचा,तर कचरा वाहतूक निविदेतही सुमारे 252 कोटी रुपयांचा जादा खर्च करून गैरव्यवहार केल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. 

मागील आठ महिन्यांच्या कालावधीत तब्बल 41 लाख 27 हजार चौरस फुटांचे टीडीआरचे वाटप केले असून त्याची किंमत 5300 कोटी रुपये असल्याचे त्यात म्हटले आहे. पालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनाही या भ्रष्टाचारात शिवसेनेप्रमाणे कॉंग्रेसनेही जबाबदार धरले आहे. 

संबंधित लेख