मिळकतकरही पेटीएमव्दारे भरण्याची पिंपरी महापालिकेची सुविधा 

मिळकतकरही पेटीएमव्दारे भरण्याची पिंपरी महापालिकेची सुविधा 

पिंपरी : केंद्रातील भाजप सरकार व त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे "डिजिटल इंडिया'चे स्वप्न आहे. अधिकाधिक व्यवहार "कॅशलेस' करण्यावर भर आहे. त्याचाच कित्ता भाजपच सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत गिरवला जात आहे. ऑनलाइनसह डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे पालिका मिळकतकर जमा करून घेत आहे. आता पेटीएमद्वारेही हा कर पालिका आता जमा करून घेणार आहे. त्यामुळे हिंजवडी, तळवडे आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांच्या जोडीने डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची मोठी सोय झाली आहे. त्यांचा वेळ वाचणार असून फक्त पाच रुपये शुल्कात या सुविधेचा लाभ त्यांना घेता येणार आहे. याद्वारे "स्मार्ट सिटी' आता "डिजिटल सिटी'ही होऊ घातली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात अंदाजे सव्वाचार लाख मिळकती आहेत. या मिळकतधारकांकडून पालिका कर आकारते.तो भरण्यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करून दिली आहे. तो रोख, धनादेश, डीडी आणि ऑनलाइन माध्यमातून सध्या स्वीकारला जात आहे. आता "पेटीएम'द्वारेही तो भरता येणार आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर एक वर्ष कालावधीसाठी असणार आहे. पेटीएमचे काम समाधानकारक असल्यास आणखी एक वर्षाची मुदतवाढ त्याला दिली जाणार आहे. या सेवेसाठी पालिका "पेटीएम'ला कोणत्याही प्रकारची रक्कम देणार नाही. "पेटीएम'वर जमा होणारा कर त्याचदिवशी पालिकेच्या बॅंक खात्यात जमा करावा लागणार आहे. त्याचदिवशी जमा न झाल्यास 100 रुपयांसाठी प्रतिदिनी पाच रुपये व्याज आकारले जाणार आहे. कर भरणाऱ्या नागरिकांकडून "पेटीएम' शुल्क वसूल करणार आहे. ते फक्त पाच रुपये असणार आहे. दुसरीकडे सध्या नेटबॅंकिंगसाठी पाच रुपये शुल्क, क्रेडिट कार्डसाठी व्यवहार रकमेच्या 0.80 टक्के, डेबिट कार्डावरील दोन हजार रुपयांच्या व्यवहारासाठी 0.50 व त्यापुढे 0.75 टक्के शुल्क आकारले जात आहे. 

कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी "पेटीएम'द्वारे मिळकत कर भरून देण्याची सुविधा पालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे करसंकलनप्रमुख तथा सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.याबाबतचा प्रस्ताव बुधवारच्या (ता.24) स्थायी समितीसमोर आहे. या सुविधेस मान्यता देण्यासाठी तो महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस समिती करणार आहे. सर्वसाधारण सभेने त्याला मंजुरी दिल्यानंतर पेटीएमव्दारे मिळकतकर भरणा सुविधा सुरू होईल, असे गावडे म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com