pimpari-chinchwad-rk-padmanabhan | Sarkarnama

पिंपरीचे पहिले पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन? 

उत्तम कुटे 
रविवार, 29 जुलै 2018

नवनिर्मित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मान ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आर.के. पद्मनाभन यांना मिळण्याची दाट शक्‍यता आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. उद्या यासंदर्भात आदेश निघणार आहे. त्याबरोबर राज्यभरातील आणखी काही ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचीही खांदेपालट होणार आहे. त्यात पुण्यालाही नवे आयुक्त मिळणार आहेत. 

पिंपरीः नवनिर्मित पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त होण्याचा मान ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आर.के. पद्मनाभन यांना मिळण्याची दाट शक्‍यता आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. उद्या यासंदर्भात आदेश निघणार आहे. त्याबरोबर राज्यभरातील आणखी काही ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचीही खांदेपालट होणार आहे. त्यात पुण्यालाही नवे आयुक्त मिळणार आहेत. 

दोन दिवसांपूर्वीच पिंपरीच्या नव्या पोलिस आयुक्तालयात दोन नंबरचे पद असलेले अतिरिक्त आयुक्त व तीन नंबरवरील दोन उपायुक्तांची बदली झाली आहे.त्यानंतर प्रतीक्षा होती ती आयुक्तांचीच. ती सुद्धा उद्या पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी,महामार्ग) पद्मनाभन यांची बदली पिंपरी-चिंचवड येथे होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. त्याबरोबर राज्यातील चार पोलिस आयुक्तांचीही बदली होणार आहे. त्यात नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशन यांचा समावेश आहे.त्यांची बदली पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून होणार असल्याचे समजते. तर, विद्यमान आयुक्त रश्‍मी शुक्‍ला या पद्मनाभन यांची जागा घेण्याची शक्‍यता आहे. 

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख व तडफदार असा लौकिक असलेले अतिरिक्त पोलिस महासंचालक यांची नवी मुंबईचे आयुक्त म्हणून बदली होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तर, असेच डॅशिंग अधिकारी असलेले ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीरसिंह यांना राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर नेमले जाणार आहे.तर राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) प्रभारी पोलिस महासंचालक विवेक फणसळकर हे परमवीरसिंह यांची जागा घेणार आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग) डॉ.भुषणकुमार उपाध्याय हे डॉ. वेंकटेशन यांच्या जागी जातील,असे समजते. तर, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना लगेच बदलीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. 

संबंधित लेख