pimpari-chinchwad news - NCP-Sivsena | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेचा याराना; सत्ताधारी भाजपला खुपेना

उत्तम कुटे
बुधवार, 26 जुलै 2017

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जवळीक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला दुजोरा देणाऱ्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी शिवसेनेचा वाढता याराना भाजपची डोकेदुखी ठरला आहे. 

पिंपरी :  पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जवळीक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला दुजोरा देणाऱ्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी शिवसेनेचा वाढता याराना भाजपची डोकेदुखी ठरला आहे. 

सलग तीन प्रकरणात राष्ट्रवादीची साथ देत सभात्याग करीत शिवसेनेने
विरोधाची हॅटट्रिक नोंदविली आहे. मात्र, विरोधी पक्षांची भूमिका आम्ही बजावत असून जनतेला
भेडसावणाऱ्या प्रश्‍नावर एक होऊन पाशवी बहुमताच्या जोरावर रेटून कारभार
करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना विरोध करीत असल्याचे सांगत शिवसेनेने
राष्ट्रवादीबरोबर आपली फरफट होत असल्याचे अमान्य केले आहे. तसेच पक्षाच्या
दोन्ही खासदारांनी पिंपरी पालिकेत लक्ष कमी केल्याने शिवसेनेचा शहरातील
दरारा कमी झाले असल्याचे म्हणणेही शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी
खोडून काढले आहे.

पिंपरीतील अनधिकृत बांधकामधारकांना लावण्यात आलेला शास्तीकर सरसकट माफ
करण्यात यावा, या मागणीवरून राष्ट्रवादीने पहिल्याच आमसभेत मोठा गोंधळ
घातला. त्यावेळी या पक्षाच्या पाच नगरसेवकांना निलंबित करण्यात आले होते.
या प्रकरणात शिवसेनेने राष्ट्रवादीला साथ दिली होती. बजेटच्या
सर्वसाधारण सभेतही ते विनाचर्चा मंजूर करण्याच्या भाजपच्या नव्या
पायंड्याला राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेही कडाडून विरोध केला होता. गेल्या मासिक सभेत स्मार्ट सिटीचे संचालकपदी शिफारस केलेले नाव डावलून
दुसऱ्याचीच नियुक्ती सत्ताधारी भाजपने केल्याने शिवसेना आणखीनच बिथरली.
आपल्या अधिकारावरील या अतिक्रमणाला त्यांनी थेट न्यायालयातच आव्हान
दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये एकत्र सत्तेत असलेल्या या दोन
पक्षांत पिंपरीत, मात्र कडवटपणा टोकास गेला आहे. 

पालिका सभेत रिंगरोड बाधितांच्या मुद्यावरून सभागृहाचा आखाडा झाला. हा
प्रश्‍न राष्ट्रवादीने उपस्थित करीत गोंधळ घातला. त्याला शिवसेनेचीही साथ
मिळाली. त्यामुळे ही सभा स्थगित करण्याची पाळी आली.  विरोधी बाकावरील अनुभवी राष्ट्रवादीच्या जोडीने शिवसेना अननुभवी व नवख्या अशा आपल्या नगरसेवकांना कोंडीत पकडत असल्याने सत्ताधारी भाजपची शिवसेनेवर खप्पा मर्जी झालेली आहे. एक वगळता सत्ताधारी 76 नगरसेवक नवे आहेत.
अशा वेळी अनुभवी राष्ट्रवादीचा सामना करताना शिवसेनेने आपल्याला साथ
द्यावी, अशी भाजपची भावना आहे. मात्र, त्याला शिवसेनेने सुरुंग लावल्याने
भाजप संतप्त आहे. परिणामी त्यांच्यात तू,तू,मैं,मैं सुरू आहे. त्यात
अनुभवी असे मागील टर्ममध्ये नगरसेवक असलेले खासदार श्रीरंग बारणे आणि
महिला शहरप्रमुख व माजी गटनेत्या सुलभा उबाळेही नव्या सभागृहात नाही. 
शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजीराव
आढळराव-पाटील यांचेही पुरेसे लक्ष पालिकेत नसल्याने हा बेबनाव व दोन
मित्रांतील गैरसमज वाढले आहेत.

संबंधित लेख