pimpari-chinchwad-mayor-mali-community-demand | Sarkarnama

पिंपरी-चिंचवडचा महापौर माळी समाजाचा करण्याची मागणी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 28 जुलै 2018

ओबीसीसाठी राखीव असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी माळी नगरसेवकाचीच नियुक्ती करण्याची एकमुखी मागणी शहरातील समाजाच्या वतीने आज पत्रकारपरिषदेत करण्यात आली. 

पिंपरीः ओबीसीसाठी राखीव असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी माळी नगरसेवकाचीच नियुक्ती करण्याची एकमुखी मागणी शहरातील समाजाच्या वतीने आज पत्रकारपरिषदेत करण्यात आली. 

भोसरीतील नगरसेवक महापौरपदासाठी इच्छूक असल्याचेही सांगण्यात आले. त्यातून हे पद भोसरी मतदारसंघातच ठेवण्यासाठी ही खेळी केली गेल्याचे स्पष्ट झाले. 

राजीनामा दिलेले महापौर नितीन काळजे हे सुद्धा भोसरीतीलच होते. गेल्यावर्षी भाजप प्रथमच पालिकेत सत्तेत आला. काळजे हे पहिले महापौर झाले. ते खरे ओबीसी नसून डुप्लीकेट असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. एवढेच नाही,तर त्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राला न्यायालयात आव्हानही देण्यात आलेले आहे. काळजे यांच्या निवडीच्या वेळी आज माळी महापौर करण्याची मागणी केलेल्या माळी समाजाने त्यावेळी ती केली नव्हती. 

यावेळी, मात्र हे पद चिंचवडकडे जाण्याची भीती व शक्यता गृहित धरून माळी समाजाने उचल खाल्ली आहे. त्यातही भोसरी मतदारसंघातीलच या समाजाचे आजी,माजी नगरसेवक आघाडीवर आहेत. `अभी नही तो कभी नही' असा नाराच त्यांनी दिला आहे. 

हे पद भोसरी विधानसभा मतदारसंघातच राहण्याचे स्पष्ट संकेतही मिळाले आहेत. तरीही ऐनवेळी शहराच्या कारभाऱ्यांकडून धक्कातंत्राचा वापर होण्याची भीती भोसरीकरांना वाटते आहे. त्यातून महापौर चिंचवडचा होऊ नये म्हणून भाजपच्या भोसरीतील माळी समाजाच्या आजी,माजी नगरसेवक समाज प्रतिनिधींनी आज ओबीसीतील माळी घटकाचाच महापौर करण्याची मागणी केल्याचे समजते. 

भोसरीच्या आमदारांचे समर्थक असलेले नगरसेवक राहूल जाधव यांचे नाव त्यासाठी घेण्यात आले. त्याजोडीने भोसरीतीलच याच समाजाचे संतोष लोंढे हे सुद्धा इच्छूक असल्याचे सांगण्यात आले. या दोघांत जाधव यांचे पारडे जड असल्याने त्यांनाच ही संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी स्थायी सदस्यत्वावरही पाणी सोडलेले आहे.

माळी समाजाच्या महापौर पदावर अनिता फरांदे, अपर्णा डोके आणि डॉ. वैशाली घोडेकर यांना काम करण्याची संधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहरात दिली आहे. परंतू माळी समाजाच्या पुरुष प्रतिनिधीस आतापर्यंत महापौर पद मिळाले नाही. त्यामुळे यावेळी पुरुष माळी महापौर करावा, अशी मागणी यावेळी समाज प्रतिनिधींनी केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर,पुन्हा समाजाला डावलेले गेले, तर आगामी निवडणूकांमध्ये भाजपला होणा-या परिणामास सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हा भाजपला घरचा आहेर समजला जात आहे. 
 

संबंधित लेख