pimpari-chinchad-rahul-jadhav-journey-ricshaw-driver-mayorship | Sarkarnama

राहुल जाधव..... रिक्षाचालक ते पिंपरी-चिंचवडचे महापौर 

उत्तम कुटे 
मंगळवार, 31 जुलै 2018

इतर पक्षातून गतवर्षी भाजपमध्ये आलेल्यांना महत्त्वाचे पद देण्याची हॅटट्रिक पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपकडून झाली आहे. आज त्यांनी महापौरपदी "मनसे'तून आलेले राहुल जाधव यांना संधी देऊन ही आगळी हॅटट्रिक साधली. दरम्यान, नियोजित महापौर यांनी आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी तब्बल पाच वर्षे रिक्षा (ऍपे तथा पॅगो) चालविलेली आहे. 

पिंपरीः इतर पक्षातून गतवर्षी भाजपमध्ये आलेल्यांना महत्त्वाचे पद देण्याची हॅटट्रिक पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपकडून झाली आहे. आज त्यांनी महापौरपदी "मनसे'तून आलेले राहुल जाधव यांना संधी देऊन ही आगळी हॅटट्रिक साधली. दरम्यान, नियोजित महापौर यांनी आपल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी तब्बल पाच वर्षे रिक्षा (ऍपे तथा पॅगो) चालविलेली आहे. 

मावळते महापौर नितीन काळजे व नियोजित महापौर राहुल जाधव यांच्यात अनेक साम्य आहेत. हे दोघेही भोसरीच्या आमदारांचे कट्टर समर्थक आहेत. दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. दोघांनाही बैलगाडा शर्यतीची आवड आहे. दोघांचे शिक्षणही जवळपास सारखेच (काळजेंचे अकरावी, तर जाधवांचे दहावी) झालेले आहे. दोघांचाही प्रभाग भोसरी मतदारसंघात आहे. भोसरीचे आमदारांना 2014 च्या मोदी लाटेत अपक्ष म्हणून निवडून आणण्यात दोघांचाही मोठा वाटा आहे. दोघेही पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील आहेत. 

शेती परवडत नसल्याने दहावी होताच जाधव यांनी पॅगो रिक्षा पाच वर्षे चालविली. नंतर 2006 ला "मनसे'चे काम सुरू केले. 2012 ला ते मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र, 2017 च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्यावर्षी ते भाजपकडून निवडून आले. दादांचे कट्टर पाठीराखे असल्याने लगेच त्यांनी स्थायी समितीवर वर्णीही लागली. मात्र, स्थायीचे अध्यक्ष न झाल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 

दरम्यान, भाजपची पालिकेत सत्ता येताच गत पालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून दाखल झालेले काळजे यांना भाजपने आपले महापौर केले. स्थायी समितीच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून शिवसेनेतून आलेल्या सीमा सावळे यांना संधी दिली. त्यांच्यानंतर मनसेतून आलेले जाधव यांना मानाचे पद देऊन भाजपने आगळीवेगळी हॅटट्रिक केली आहे. ती करताना जुन्या भाजपाईंना डावललण्याचीही हॅटट्रिक झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख