pimpari-bjp | Sarkarnama

भाजपमधील बंड थंड झाल्याने `स्थायी'साठी भाव फुटलाच नाही

उत्तम कुटे
मंगळवार, 6 मार्च 2018

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून सत्ताधारी भाजपमध्ये उठलेले वादळ हे पेल्यातलेच ठरले आहे. त्यामुळे उद्याच्या या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा विजय आता निश्‍चित मानला जात आहे. तरीही सावधगिरीची उपाय म्हणून भाजपने दोन पानी व्हिप जारी केला आहे. 

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून सत्ताधारी भाजपमध्ये उठलेले वादळ हे पेल्यातलेच ठरले आहे. त्यामुळे उद्याच्या या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराचा विजय आता निश्‍चित मानला जात आहे. तरीही सावधगिरीची उपाय म्हणून भाजपने दोन पानी व्हिप जारी केला आहे. 

विरोधी उमेदवाराला मत दिले वा मतदानाला गैरहजर राहिलात, तर नगरसेवकपद रद्द करू, असा इशारा सत्ताधारी दहा स्थायीच्या सदस्यांना हा व्हीप जारी करणारे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी दिला आहे. त्यामुळे नाराज सत्ताधारी स्थायी सदस्य मतदारांना गैरहजर ठेवून आपले ईप्सित साधण्याची विरोधी पक्षाच्या उमेदवारीची खेळीही आता हुकली आहे. 

दरम्यान, भाजपमधील बंड थंड झाल्याने स्थायीसाठी भाव फुटलाच नाही. त्यामुळे स्थायीच्या सदस्यांची मोठी निराशा झाली. त्यांच्या बोलण्यातून ती व्यक्त झाली. कुणाचे फोनही आले नाही, असे भाजप व विरोधी पक्षाच्या एकेका स्थायी सदस्याने सांगितले. बंडोबा थंडोबा झाल्याने सुरवातीला परवा जोमात असलेल्या विरोधी उमेदवाराचे अवसान आज गळून पडल्याचे दिसून आले. त्यामुळे ते उद्या ऐनवेळी माघार घेण्याची शक्‍यता आहे. त्यातून ही निवड बिनविरोध होईल, असे संकेत मिळाले आहेत. 

स्थायीचे मावळते अध्यक्ष हे शहराचे कारभारी आणि आमदार लक्ष्मण जगताप गटाचे होते. त्यामुळे पालिकेत भाजपची सत्ता आणण्यात मोठा वाटा असलेले पक्षाचे दुसरे आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकाचा आता त्यासाठी टर्न होता. मात्र, या गटाचे डावपेच कमी पडले. ही संधी साधून मुत्सद्दी व राजकारणाच्या डावपेचात पटाईत असलेल्या जगताप साधली. पुन्हा आपला मोहरा त्यांनी पुढे करीत हुषारीची चाल खेळली. त्यामुळे लांडगे गट बिथरला. त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले. परिणामी उद्याची स्थायी अध्यक्षपदाची निवडणूक काहीशी अडचणीत आली होती. मात्र, लांडगे गटाचे बंड पक्षश्रेष्ठींपुढे थंड झाले. त्यामुळे जगताप गट पुन्हा बाजीगर ठरला.त्यातून पालिकेच्या खजिन्याची चावी पुन्हा त्यांच्याच गटाकडे येण्याचा मार्गही मोकळा झाला. 

जगताप यांचे कट्टर समर्थक असलेले पालिकेतील सभागृहनेते एकनाथ पवार यांनी स्थायी अध्यक्षपद निवडणुकीसाठी आज व्हिप जार केला. स्थायीचे 16 सदस्य आहेत. त्यात सत्ताधारी भाजपचे 10 आहेत. अपक्षांचा एक सदस्यही त्यांच्याबाजूने आहे. तर विरोधी राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचा एक सदस्य असे स्थायीचे बलाबल आहे. आमचे 11 सदस्य असल्याने या निवडणुकीची एक टक्काही चिंता नाही, असे पवार म्हणाले. 

संबंधित लेख