Pichad critises Dodson Company | Sarkarnama

पिचड याचा तीर अमेरिकेच्या 'डॉडसन'वर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 जुलै 2017

'डॉडसन या कंपनीने बेकायदा पाणी वळवून वीजनिर्मिती सुरू ठेवली आहे. धरणाच्या आवर्तन काळातील पाण्यावर वीजनिर्मितीचा करार आहे. इतर पाणी त्यांना कोदणी जलविद्युतगृहाकडे वळविण्याचा अधिकार नाही. हे वाढीव पाणी वळवून ही कंपनी शासनाचीही फसवणूक करत आहे. - मधुकर पिचड

नगर : भंडारदरा धरणावरील रंधा धबधबा सध्या बंद झाला आहे. त्याचे कारण म्हणजे अमेरिकन कंपनीची वीजनिर्मिती असल्याचा आरोप करून माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आता 'डॉडसन' नावाच्या कंपनीला लक्ष्य केले आहे. कोदणीच्या बोगद्यातून बेकायदा पाणी वळवून ही विजनिर्मिती केली जात असल्याचे पिचड यांचे म्हणणे आहे.

हे बेकायदा पाणी वळविणे म्हणजे जलसंपदा विभाग व या कंपनीत झालेल्या कराराचा हा भंग असून, अशा प्रकारे पाणी वळविल्यामुळे रंधा धबधबाही बंद झाला. परिणामी पर्यटकांची संख्या रोडावली. त्याचा विपरित परिणाम आदिवासींच्या रोजगारावर झाला आहे. त्यामुळे या कंपनीलाच जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मागणी पिचड यांनी केली आहे.

'डॉडसन या कंपनीने बेकायदा पाणी वळवून वीजनिर्मिती सुरू ठेवली आहे. धरणाच्या आवर्तन काळातील पाण्यावर वीजनिर्मितीचा करार आहे. इतर पाणी त्यांना कोदणी जलविद्युतगृहाकडे वळविण्याचा अधिकार नाही. हे वाढीव पाणी वळवून ही कंपनी शासनाचीही फसवणूक करत आहे. कंपनीने वळविलेले पाणी पुन्हा रंधा धबधब्याकडून सोडावे, यासाठी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना नऊ ते दहा वेळा फोन केले; पण त्यांनी "डॉडसन कंपनीची परवानगी घ्यावी लागेल" असे उत्तर दिले. त्यामुळे भंडारदऱ्याच्या पाण्यावर डॉडसनचा अधिकार की शासनाचा, हा प्रश्न निर्माण होतो,' असे पिचड म्हणतात.

चुकीचा अहवाल देणाऱ्याचीच नियुक्ती
'या प्रकारामागे मोठे षड्‌यंत्र आहे. जलसंपदा विभागातील निवृत्त सचिव हि. ता. मेंढेगिरी यांची कंपनीने प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. ज्या अधिकाऱ्याने समन्यायी पाणीवाटपाचा चुकीचा अहवाल सादर करून समाजाची घोर फसवणूक केली, अशा अधिकाऱ्याची ही कंपनी नेमणूक करते, यामागे मोठे काळेबेरे असण्याची शक्‍यता आहे. तेव्हा ही कंपनीच हद्दपार केली पाहिजे. तिच्या सर्व कारभाराची चौकशी झाली पाहिजे,' अशी पिचड यांची मागणी आहे.

संबंधित लेख