pi shilimkar | Sarkarnama

PI शिळीमकरांना स्मशानातील अभ्यासाने मिळाले धाडस! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

अपवित्र आणि भीतीदायक ठिकाण म्हणून आजही स्मशानभूमीकडे पाहिले जाते. 25-30 वर्षापुर्वीची स्थिती तर फार भयानक होती. स्मशानात भुताखेतांचे वास्तव्य असते अन तिथे गेले तर भूत आपल्याला मारुन टाकते, अशी लोकभावना रुढ होती. एकटेदुकटे स्मशानात लोक जात नसत; भयाण शांतता असायची. मात्र याच भयाण शांततेच्या साक्षीने एका मुलाच्या मनात धाडसाचे बीजारोपण झाले. तो पुढे धडाकेबाज पोलिस अधिकारी बनला! 

पुणे : अपवित्र आणि भीतीदायक ठिकाण म्हणून आजही स्मशानभूमीकडे पाहिले जाते. 25-30 वर्षापुर्वीची स्थिती तर फार भयानक होती. स्मशानात भुताखेतांचे वास्तव्य असते अन तिथे गेले तर भूत आपल्याला मारुन टाकते, अशी लोकभावना रुढ होती. एकटेदुकटे स्मशानात लोक जात नसत; भयाण शांतता असायची. मात्र याच भयाण शांततेच्या साक्षीने एका मुलाच्या मनात धाडसाचे बीजारोपण झाले. तो पुढे धडाकेबाज पोलिस अधिकारी बनला! 

अविनाश शिळीमकर हे त्यांचे नाव. शिळीमकर मूळ पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्‍यातील. ते सद्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आहेत. बेताची परिस्थिती असलेल्या कुटूंबातून शिळीमकर पुढे आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक परीक्षा (PSI) उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी जिथे जाईल तिथे आपला ठसा उमटवून दाखवला आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखेत, तसेच नागपूरला गुन्हे शाखेत असताना त्यांनी केलेल्या कारवाया गाजल्या होत्या. गुन्हेगारांना जरब बसविण्यात ते यशस्वी झाले होते. या कारवाईदरम्यान गोळीबाराच्या घटनाही घडल्या होत्या. जनसंपर्काची हातोटी असलेला हा अधिकारी मुख्यत: धाडसासाठी प्रसिद्ध आहे. हे धाडस त्यांना स्मशानभूमीत केलेल्या अभ्यासामुळे मिळाल्याचे ते सांगतात. नुकतेच अकोला येथील अगस्ती विद्यालयातील नायकवडी व्याख्यानमालेत शिळीमकर यांनी आपल्या वाटचालीतील अनुभव शेअर केले. शिळीमकर म्हणाले, "स्मशानभूमीइतकीच शांत जागा कोणतीच नव्हती. त्यामुळे शालेय जीवनात बऱ्याचदा स्मशानभूमीत अभ्यास केला. स्मशानभूमीतील अभ्यास कठोर परीश्रम आणि धाडसाचे बीजारोपण करुन गेला.' 
आपल्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करुन वाटचाल करा. अंधश्रद्धांना थारा देऊ नका. वेळेचा सदुपयोग करा. जिद्द, चिकाटी, वाचन, संयम यांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी केले. 
 

संबंधित लेख