pi govind omase relation with bad elememt | Sarkarnama

शेवगावात PI ओमासेंची खलप्रवृत्तींशी यारी, सहा महिन्यांपासून शिरजोरी! 

मुरलीधर कराळे 
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे प्रताप पाहता त्यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी असल्याचे शेवगावचे नगरसेवक कमलेश गांधी यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. याच मागणीसाठी यापूर्वी येथील एका शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार दिलीप गांधी, पोलिस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली. मात्र ओमासे यांची बदली झाली नाही. नगरसेवक अशोक आहुजा, भाजपचे तालुका सरचिटणीस सुनील रासणे, भाजपचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर आदींचा शिष्टमंडळात समावेश होता, असे गांधी यांनी सांगितले. 

नगर : सहा महिन्यांपूर्वी बदली होऊन शेवगावला आलेल्या पोलिस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी पदभार घेतल्यानंतर शेवगाव तालुक्‍यातील गुन्हेगारीविश्व या ना त्या कारणाने चर्चेत येवू लागले. ओमसे यांनी अनेक प्रताप केले, पण गुन्हेगारांना पकडण्याचे नव्हे, तर त्यांना साथ देण्याचे, अशीच चर्चा सध्या शेवगाव तालुक्‍यातून सुरू आहे. 

शेवगाव तालुक्‍यातील खानापूर आणि घोटण येथे पाच महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते. त्या वेळी ओमासे नवीनच आले होते. पोलिसांच्या गाडीच्या जाळीला लटकून ओमासे यांनी शेतकऱ्यांना विरोध केल्याने वाद वाढला. त्यानंतर झालेल्या गोळीबारामुळे हे प्रकरण अधिकच चिघळून राज्यभर गाजले. 

शेवगावमधील नगरसेवक अशोक आहुजा हे त्यांच्या प्रभागातील वाद मिटविण्यासाठी गेले होते. मात्र ओमासे यांनीच आहुजा यांना मारहाण केली. या वेळी तालुक्‍यातील चिडलेल्या कार्यकर्त्यांनी ओमासे यांच्या बदलीसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकरणामुळे ओमासे पुन्हा जिल्ह्यात गाजले. 

शेवगाव तालुक्‍यातील वाळुतस्करीला ओमासे मदत करतात, असा आरोप नागरिकांमधून कायम होत आहे. ओमासे आल्यापासून वाळुतस्करी अधिकच फोफावली आहे. गुन्हेगारांवर वचक बसविण्याऐवजी ओमासे मदत कर असतात, असा आरोप नागरिकांमधून होत आहे. वाळुचा ट्रॅक्‍टर ढाकणे व गाढे या दोन पोलिसांनी चापडगावला पकडला होता. संबंधित ट्रॅक्‍टर इसारवाडे याच्या नातेवाईकाचा असल्याचे समजते. त्यामुळे ओमासे यांनीच दोन पोलिसांना बडतर्फ करण्यास पुढाकार घेतल्याचे समजते. 

पोलिस ठाण्यातील स्टोअररुममधून रिव्हाल्वहरची चोरी झाली, हे प्रकरणही चांगलेच गाजले. ओमासे यांच्याच कार्यकाळात झालेली ही चोरी राज्यभर चर्चेची ठरली. पोलिस ठाण्यातूनच झालेल्या या चोरीमुळे असुरक्षितता वाढली होती. 

आमदाराचे नातेवाईक असल्याचे भासवून शिवसंग्राम पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ इसारवाडे याने सव्वा सहा लाखांचा गंडा घातल्याची फिर्याद ओमासे यांनी दिली. त्यामुळे ओमासे यांच्या प्रतापाचे बिंग फुटले. इसारवाडे याच्या पत्नीने थेट पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात ओमासे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. इसारवाडे यांच्यावर कालही दोन गुन्हे दाखल झाले. तेही ओमासे यांच्यामुळेच झाले, असल्याचा आरोप होत आहे. 

 

संबंधित लेख