सत्ताधारी आघाडीबरोबर आणखी 25 आमदार?

 सत्ताधारी आघाडीबरोबर आणखी 25 आमदार?

मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला दहा वर्षांनी शिवसेनेने पाठिंबा दिलेला असतानाच आणखी 25 मते या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या गळाला लागण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनिमित्त शक्तिप्रदर्शनाची संधी मिळाली आहे.

सर्व पक्षांच्या आमदारांवर मोहिनी घालून त्यांना विकासकामांचे गाजर दाखविण्याचे फडणवीस यांचे कसब यानिमित्ताने फलदायी ठरणार आहे, अशी चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांनीही या मोहिमेला हातभार लावणे सुरू ठेवले असून दोन दिवसांत विरोधी बाकांवरून सत्ताधाऱ्यांना पाठवले जाणारे निरोप वाढणार असल्याचे मानले जात आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांनीही समर्थन वाढण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 
महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून अनेक आमदारांची नावे जोडली जात असतानाच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोणताही पक्षादेश (व्हिप) नसल्याने शक्तिप्रदर्शन करणे मुख्यमंत्र्यांच्या पाठीराख्यांना सोपे जाईल.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही आमदार त्यांच्या निष्ठा दाखवण्यासाठी रामनाथ कोविंद यांना मतदान करतील. भाजपचे आमदार तीन दिवस मुंबईत मुक्‍कामी आहेत. त्यांनीही स्वत:च्या शक्‍तीनुसार संपर्क वाढविणे सुरू केले आहे; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची नावे अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सदस्यांशी संपर्क साधला आहे. पक्षादेशाचे या निवडणुकीत प्रयोजन नसते, त्यामुळे निरोप पाठवून आमदारांना बरोबर राहा, अयोग्य पाऊल उचलू नका, असे सांगण्यात येत आहे. 
मतदानासाठी खास पेन 
येत्या सोमवारी (ता. 17) सकाळी मतदानास सुरवात होईल. विधिमंडळ कक्षात आमदारांना त्यासाठी खास पेन देण्यात येईल. त्या विशिष्ट शाईनेच स्वाक्षरी करायची आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com