People love saffron & Shiv sena : Aditya Thakray | Sarkarnama

 राज्यातील जनतेचे भगव्यावर व शिवसेनेवर मोठे प्रेम : आदित्य ठाकरे  

सरकारनामा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

श्री. ठाकरे यावेळी भाषण करणार नव्हते. मात्र येथील उत्साह व जनसमुदाय पाहून त्यांनी माईकचा ताबा घेत अवघे चार मिनीट भाषण केले. 

मालेगाव  : राज्याच्या काना कोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो.

आपला हा दौरा राजकीय नाही. यामुळे राज्यव्यापी दौऱ्यात सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. राज्यातील जनतेचे भगव्यावर व शिवसेनेवर मोठे प्रेम आहे. आगामी काळात एक भगवा महाराष्ट्र घडवू या असे आवाहन शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज शुक्रवारी येथे केले. 

येथील बाजार समितीच्या शेडमध्ये झालेल्या सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीराच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री. ठाकरे यावेळी भाषण करणार नव्हते. मात्र येथील उत्साह व जनसमुदाय पाहून त्यांनी माईकचा ताबा घेत अवघे चार मिनीट भाषण केले. 

अवघ्या वीस मिनिटात हा कार्यक्रम आटोपला. व्यासपीठावर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, युवानेते वरुण सरदेसाई, आमदार नरेंद्र दराडे, उपमहापौर सखाराम घोडके, स्थायी समिती सभापती जयप्रकाश पाटील, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, महानगरप्रमुख रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, मनोहर बच्छाव, प्रमोद पाटील, महिला आघाडीच्या ज्योती भोसले, युवानेते अविष्कार भुसे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वाघ आदी व्यासपीठावर होते.

ग्रामविकास राज्यमंत्री श्री. भुसे यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याचा उद्देश सांगितला. शिवसेनेच्या तत्वाप्रमाणे ८० टक्के सामाजिक उपक्रम या दौऱ्यात राबविले जात आहे. येथील आरोग्य शिबीरात २० तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले असून तपासणीसाठी दहा स्वतंत्र दालन करण्यात अाले आहे. 

संबंधित लेख