स्फोटक विषयावर शांततेत चर्चा !

pimpri-chinchwad
pimpri-chinchwad

पिंपरीः शास्तीकरावरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आमसभेत गेल्या महिन्यात अभूतपूर्व गोंधळ होऊन विरोधी पक्षनेत्यासह चार विरोधी सदस्यांचे निलंबन झाले होते. हाच प्रश्न शनिवारी (ता6) पुन्हा चर्चिला गेला.मात्र, यावेळी सभागृह शांत होते. उलट सत्ताधारी सदस्यांकडून विरोधकांचा उल्लेख आदरार्थी केला जात होता. 


कारण ही अभिरुप सभा होती.ती पिंपरी पालिका मुख्यालयात,नव्हे,तर भाईंदर (जि.ठाणे) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भरविण्यात आली होती. तसेच त्यात फक्त भाजपचेच नगरसेवक सामील झाले होते.

 प्रथमच पिंपरी पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपचे 80 टक्के नगरसेवक प्रथमच निवडून आल्याने त्यांना पालिका कामकाज माहिती व्हावे,यासाठी दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.त्याचा समारोप काल या अभिरुप सभेने झाला.

राष्ट्रवादीसह इतर पक्षातून नव्यानेच भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांना पक्ष,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ कुटुंबाची ओळख करून देण्याचा हेतूही यामागे होता.

शिबिराची सुरवात परवा वेळापत्रकानुसार झाली.मात्र समारोप काल त्यानुसार झाला नाही.समारोपाचे वक्ते ऐनवेळच्या तातडीमुळे येऊ न शकल्याने भाजपचे पालिकेतील सभागृहनेते एकनाथ पवार यांनी ती  जबाबदारी  पार पाडली.तसेच त्यापूर्वी झालेल्या अभिरुप सभेच्या अध्यक्षस्थानीही महापौर नितीन काळजे यांच्याऐवजी तेच होते. या सभेत शहराला भेडसावणाऱ्या अनिधिकृत बांधकामे आणि शास्तीकर या ज्वलंत विषयावर चर्चा झाली. शास्तीवरूनच पालिकेच्या गेल्या आमसभेत मोठा गोंधळ झाला होता. यावेळी,मात्र, विरोधकाच्या भुमिकेत कोणीही नसल्याने तो झाला नाही.

विरोधकांचा आदरार्थी उल्लेख करावा, महिला सदस्यांचा मान राखावा,चर्चेत भाग घेण्यासाठी हात वर करून परवानगी घ्यावी, औचित्याचा मुद्दा कसा व कधी उपस्थित करावा याविषयी या अभिरुप सभेत नव्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिराचा समारोप संघाच्या माहितीसत्राने झाला.त्यात भाजपची 
स्थापना कधी व कशी झाली, संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांचीही माहिती दिली गेली.दरम्यान, शहरात नुकताच दिवसाआड पाणीपुरवठा सुरु झाल्याने रहिवाशांच्या पाण्यासंदर्भातील तक्रारी आणि लग्नाची आमंत्रणे नगरसेवकांकडे येऊ लागल्या. त्यामुळे प्रशिक्षण संपताच मुंबईजवळ जाऊनही जिवाची मुंबई न करता नगरसेवकांना पुन्हा पिंपरी-चिंचवडकडे माघारी फिरावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com