pcmc politics | Sarkarnama

उद्योगनगरीत सर्वच पक्षांत खदखद 

उत्तम कुटे : सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 24 मार्च 2017

प्रामाणिक शिवसैनिकाला न्याय मिळत नसल्याने पक्षातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून मी शिवसेना सोडली आहे.
- चारुशीला कुटे 

पिंपरी : भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनंतर आता शिवसेनेतील असंतोष पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आला आहे. आयारामांना मानाचे पान आणि निष्ठावंतांना ठेंगा
दाखविल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या दोन माजी नगरसेविका, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवा सेना अधिकारी व कार्यकर्ते अशा साडेतीनशेजणांनी पक्षाला
सोडचिठ्ठी दिल्याने शहरात शिवसेनेलाही मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे शहरात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांत आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. 

भाजप नुकतीच उद्योगनगरीत सत्तेत आली आहे. मात्र, सत्तेत येण्यापूर्वी या पक्षातील गटबाजी प्रकर्षाने समोर आली होती. गडकरी आणि मुंडे गटामुळे पक्ष दुभंगला
होता. नंतर केंद्र व राज्यात सत्तेत आल्यानंतर ही दरी मिटली. दरम्यान, राष्ट्रवादीतून आलेल्या तालेवार नेत्यांमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही भाजपची सत्ता
आली. मात्र, जुना, नवा हा संघर्ष अद्याप कायम आहे. तर, एकेकाळी वैभवात असलेल्या कॉंग्रेसचीही निवडणुकीपूर्वी दोन शकले झाली. एक मोठा गट राष्ट्रवादीत गेला.
त्यामुळे सव्वाशे वर्ष जुन्या असलेल्या या पक्षाला पालिका निवडणुकीत एकही जागा न मिळण्याची नामुष्की नुकतीच ओढवली. त्यामुळे तेथेही शहराध्यक्ष सचिन साठे
यांना दूर करून तेथे निष्ठावानाला संधी देण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे अनेक पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

निवडणुकीनंतर राष्ट्रवादीतील मतभेदही समोर आले आहेत. या पक्षाचे पालिकेतील नवनियुक्त गटनेते योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नसल्याचे नगरसेवक दत्ता साने यांनी जाहीर
केले आहे. त्याचा प्रत्यय नुकताच आला. बहल यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षाला पुरेसे दालन न दिल्याच्या निषेधार्थ महापौर नितीन काळजे यांच्या दालनाबाहेर
राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनात साने व त्यांचे समर्थक सहभागी झाले नाहीत. तसेच बहल यांच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट
केले आहे. 

अशारीतीने शहरातील वरील तीन प्रमुख पक्षांतील असंतोष व खदखद सुरू असताना शिवसेनाच काय ती बाकी होती. मात्र, या पक्षातही बेकीही आता समोर आली
आहे. निष्ठावंतांना डावलून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना व पक्षात नुकतेच आलेल्यांना पदे व संधी दिली जात असल्याच्या निषेधार्थ मावळत्या सभागृहातील
शिवसेनेच्या नगरसेविका चारुशीला कुटे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा शहरप्रमुख राहुल कलाटे यांना सादर केला. त्यांना स्थायी सदस्यत्वासाठी पक्षाने गेल्या
पाच वर्षात संधी दिली नव्हती. त्यामुळे यावेळी निवडून आलेला त्यांचा मुलगा प्रमोद याला स्थायीचे सदस्य करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र,ती
नाकारण्यात आल्याने संतापलेल्या कुटे यांनी राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे.

त्यांच्याजोडीने आकुर्डी-दत्तवाडीमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पक्षाला
रामराम ठोकला आहे.त्यात माजी नगरसेविका ऍड.ऊर्मिला काळभोर,तसेच नुकतीच पालिका निवडणूक लढविलेल्या शर्मिला काळभोर, दत्तवाडी-आकुर्डी विभागप्रमुख
फारुक शेख, उपविभागप्रमुख सचिन निमट, शाखाप्रमुख सचिन वाळूंज, गोविंद काळभोर,युवा सेना अधिकारी स्वप्नील काळभोर आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या
समर्थकांसह पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. 

 

संबंधित लेख