pcmc politics | Sarkarnama

मोठ्या कार्यालयासाठी राष्ट्रवादीवर आंदोलनाची वेळ 

उत्तम कुटे : सरकारनामा ब्यु
गुरुवार, 23 मार्च 2017

मोठे कार्यालय न मिळाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने येथील महापालिका मुख्यालयात महापौर दालनाबाहेर खुर्च्या मांडून गुरुवारी (ता.23) तेथे विरोधी पक्षाचे तात्पुरते कार्यालय थाटले.

पिंपरी : आपल्या सदस्यांना सामावून घेईल इतके मोठे कार्यालय न मिळाल्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने येथील महापालिका मुख्यालयात महापौर दालनाबाहेर खुर्च्या मांडून गुरुवारी (ता.23) तेथे विरोधी पक्षाचे तात्पुरते कार्यालय थाटले. आमसभेच्या दिवशीच हे अभिनव
आंदोलन छेडण्यात आल्याने ते चर्चेचा विषय झाले. 

महापौर नितीन काळजे यांनी राष्ट्रवादीच्या आंदोलनाची संभावना राजकीय स्टंट अशी केली. त्याला आमचा हा पारदर्शक कारभार असल्याचे उत्तर विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे गटनेते योगेश बहल यांनी दिले.दरम्यान, या आंदोलनानंतर पालिका प्रशासन हलले. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि शहर अभियंता अंबादास चव्हाण
यांनी विरोधी पक्षाला पुरेसे दालन देण्यासाठी पालिकेतील नगरसचिव कार्यालयासह इतर जागांचा शोध लगेच सुरू केला. 

पालिकेतील मावळते विरोधी पक्षनेते असलेल्या कॉंग्रेसचे कार्यालय राष्ट्रवादीसाठी देऊ करण्यात आले आहे. मात्र, ते आपल्या  दस्यसंख्येला (36) पुरेल एवढे नसल्याने त्याचा ताबा त्यांनी अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड होऊनही योगेश बहल हे या कार्यालयातील विरोधी पक्षनेत्याच्या
खुर्चीत अद्याप बसलेले नाहीत. उपमहापौर व सत्तारूढ पक्षनेत्यांच्या दालनाची तात्पुरती मागणी त्यांनी केली आहे.

विरोधी पक्षासाठी प्रशस्त व पुरेशा कार्यालयाची व्यवस्था होईपर्यंत ही दोन दालने व महापौर दालन वापरू देण्याची मागणी बहल यांनी महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे. मात्र,त्याची दखल न घेतल्याने त्यांनी आज हे अभिनव आंदोलन केले. त्यात दत्ता साने वगळता पक्षाचे बहुतांश नगरसेवक सामील झाले होते. त्यानंतर ते आमसभेला गेले. मात्र, तेथेही त्यांचा निषेधाचा आंदोलन सुरूच राहिले. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल बहल यांनी यावेळी महापौर व आयुक्तांच्या हस्ते सत्कार सभागृह नेत्याच्या विनवणीनंतरही सभागृहात घेतला नाही. तर स्थायीसह विविध विषय समितीच्या सदस्यपदी निवड झालेल्या पक्षाच्या सदस्यांनीही खालूनच त्याचा स्वीकार
केला. 
 

संबंधित लेख