PCMC Leader of the House May Be Changed | Sarkarnama

आता पिंपरी महापालिकेच्या सभागृहनेते बदलाची चर्चा 

उत्तम कुटे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

या पदी जुने एकनिष्ठ भाजपाई एकनाथ पवार आहेत. हेच काय ते एकमेव असे मोठे पद सध्या पालिकेत जुन्या भाजपाईंकडे आहे. त्यामुळे ते ही बदलले,तर या गटात मोठी नाराजी पसरेल.ती आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या दृष्टीने हितकारक नसल्याने पवार यांना भाजप पक्षेश्रेष्ठी बदलण्याची शक्यता कमी दिसते आहे. दुसरीकडे त्यांनीही आपले पद शाबूत ठेवण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरु आहे.

पिंपरी : सर्वांना पदाची संधी मिळावी या हेतूने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व पदे वर्षभरातच बदलली गेली आहेत. परवा (ता.31) महापौर व उपमहापौर बदलण्यात आले. सभागृहनेते आता तेवढे बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलाचीही चर्चा आता रंगली आहे. शहर भाजपमधील एक गट हा बदल करण्यासाठी आग्रही आहे. मात्र, तूर्त तो होणे अवघड दिसतो आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही 'रिस्क' भाजप घेईल, असे राजकीय जाणकारांना वाटत नाही.

महापौर निवडीनंतर हा बदल होईल, अशी एक चर्चा आहे. तर त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे, असेही ऐकायला मिळाले. या पदी जुने एकनिष्ठ भाजपाई एकनाथ पवार आहेत. हेच काय ते एकमेव असे मोठे पद सध्या पालिकेत जुन्या भाजपाईंकडे आहे. त्यामुळे ते ही बदलले,तर या गटात मोठी नाराजी पसरेल.ती आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या दृष्टीने हितकारक नसल्याने पवार यांना भाजप पक्षेश्रेष्ठी बदलण्याची शक्यता कमी दिसते आहे. दुसरीकडे त्यांनीही आपले पद शाबूत ठेवण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरु आहे.

काल महापौरपदी मनसेतून भाजपमध्ये आलेले राहूल जाधव यांना भाजपने संधी दिली. तर श्रीमंत पालिकेच्या खजिन्याची चावी असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदीही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येऊन नगरसेवक झालेल्या ममता गायकवाड आहेत. त्यामुळे तिसरे मोठे पालिकेतील सभागृहनेते पद पवार यांच्या रुपाने जुन्या भाजपाईकडे आहे. महापौरपद भोसरीकडे(दादा),उपमहापौरपद आणि स्थायी अध्यक्षपद चिंचवडकडे (भाऊ), तर सभागृहनेतेपद जुन्या भाजपाईकडे आहे. त्यामुळे पद वाटपात सध्या समतोल साधला गेलेला आहे. परिणामी पवार यांचे पद बदलले जाईल, असे दिसत नाही. स्वत: पवार यांनीही त्याला दुजोरा दिला. बाहेर काहीही चर्चा सुरु असूद्या, मी पदावर कायम राहणार आहे, असे त्यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. 

निवडणुकीच्या तोंडावर सभागृहनेतेपद बदलणे भाजपच्या दृष्टीने धोकादायकही ठरणार आहे. ही नेमणूक प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्यामुळे तेच हा बदल करू शकतात. आणि पक्षहित व आगामी निवडणुक लक्षात घेतली, तर ते पाऊल उचलणार नाहीत, असा जुन्या भाजपाईंचा दावा आहे. त्यामुळे पवार बदलासाठी आग्रही असलेल्या शहर पक्षातील गटाला हात चोळतच बसावे लागणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यातून जुने भाजपाई शांत होणार असले, तरी मूळ रहिवाशी असलेले गावकरी नगरसेवक नाराज होणार आहेत. ते सुद्धा पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे पवार यांना बदलून त्या जागी मराठा नगरसेवकाला बसविण्याची मागणी शहर भाजपमधील एका गटाची आहे.

संबंधित लेख