PCMC Hawkers Issue | Sarkarnama

खासदार, आमदारांच्या वादात फेरीवाले धास्तावले

उत्तम कुटे
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

अतिक्रमणासह अस्वच्छता, गुंडगिरीमुळे उद्योगनगरी बकाल झाली असून तिचा दर्जा घसरल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व श्रीरंग बारणे यांनी नुकताच स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्याला भाजपचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी लगेच तसेच सडेतोड उत्तर दिले.

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील अतिक्रमणांवरून शिवसेना खासदार आणि भाजप आमदारांत सुरु झालेल्या तू,तू,मैं,मैं मुळे शहरातील फेरीवाले, मात्र धास्तावले आहेत. त्यातून त्यांच्या रोजीरोटीचाच प्रश्न निर्माण झाल्याने फेरीवाल्यांविरुद्धच्या कारवाईसाठी आरोप, प्रत्यारोप करणाऱ्या या खासदार, आमदारांनी हॉकर्स झोनसाठी एकत्र यावे, अशी विनंतीवजा मागणी त्यांनी केली आहे.

अतिक्रमणासह अस्वच्छता, गुंडगिरीमुळे उद्योगनगरी बकाल झाली असून तिचा दर्जा घसरल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील व श्रीरंग बारणे यांनी नुकताच स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्याला भाजपचे आमदार व शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी लगेच तसेच सडेतोड उत्तर दिले. एवढेच नाही, तर या अतिक्रमणाविरुद्धच्या कारवाईला खासदार बारणे राहत असलेल्या ठिकाणापासून सुरवात करू या, असेही ते म्हणाले होते. 

त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांना धडकी भरली. या दोघांच्या भांडणात आपला बळी जाण्याच्या शक्यतेने ते धास्तावले. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना या दोघा खासदार, आमदारांचे आर्जव करण्याची पाळी आली. राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी हॉकर्स झोनसाठी एकत्र यावे, असे आवाहन महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे कार्याध्यक्ष इरफान चौधरी यांनी केले आहे.

अतिक्रमणे व हातगाडी, टपरीधारकांमुळे शहरातील वाहतूक कोंडी यावरून खासदार श्रीरंगअप्पा बारणे, व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यात आरोप,प्रत्यारोप सुरु आहे. त्यात रस्त्यावर उपजीविका करणारा हातगाडी, टपरीधारक भरडला जाणार आहे. त्यामुळे या गरीब, व गरजू लोकांसाठी बारणे, जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील या राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शहरातील लोकप्रतिनिधींनी फेरीवाल्यांचे भले करण्यासाठी एकत्र येऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावून कष्टकरी वर्गाला कायस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन फेरीवाल्यांचे नेते व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांना करण्याची पाळी आली आहे. 

ते यासंदर्भात 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले, ''पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फेरीवाला कायदा व धोरण स्वीकारले आहे. मात्र, त्याचा अंमल  करण्याबाबत पालिका प्रशासन चालढकल करीत आहे. त्यांचे निष्क्रिय अधिकारी आणि बेजबाबदार सत्ताधारी यामुळे आधी राष्ट्रवादी काँग्रेस, आणि आता भाजपाच्याही सत्ताकाळात हॉकर्स झोनचा प्रश्न लटकलेला आहे. अच्छे दिनचे ते स्वप्नच आता वाटू लागले आहे. राजकीय पक्ष हे कामगार कष्टकरी, फेरीवाला, यांचा केवळ निवडणुकीपुरता विचार करीत आहेत. त्यांनी निवडणुक जाहीरनाम्यात सुनियोजित भाजी मंडई, हॉकर्स झोनच्या वल्गना केल्या. आधी राष्ट्रवादीने अमलबजावणी केली नाही. आता भाजपच्या सत्ताधारी मंडळींनी ती केल्यास नक्की सबका साथ सबका विकास होणार आहे. अन्यथा ती पण केवळ घोषणाच ठरणार आहे.''

फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होते, हे नखाते यांना मान्य नाही. त्याची अनेक कारणे आहेत, असे ते म्हणाले. अनेक ठिकाणी चारचाकी वाहनांमुळे ती होते. मात्र, केवळ फेरीवाल्यांना टार्गेट केले जात आहे, असे ते म्हणाले. शहरात अनेक गुंड ,पुढारी हातगाडीच्या आडून भाडे खाण्याचा ,हप्ते घेण्याचा प्रकार करीत असून त्याला आळा घालण्यासाठी हॉकर्स झोन हाच पर्याय आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख