PCMC Ashadh Party's Opponents kept Distance | Sarkarnama

पिंपरीत सत्ताधाऱ्यांचा आखाड, विरोधकांचा श्रावण

उत्तम कुटे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

दरवर्षी आखाड शहरात जोरात होतो. काही हॉटेले त्यासाठी महिनाभर सजलेली असतात. यावेळी, मात्र आखाड वैयक्तिकच अधिक साजरा झाला. सामुहिक होणारा राजकीय आखाड तसा झालाच नाही. त्यातही आखाड संपता संपता सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी तो केला. शेवटच्या आठवड्यात या पार्ट्या रंगल्या. तसेच तो हॉटेलात साजरा करण्याकडे यावेळी कल अधिक होता.

पिंपरी : यावर्षीचा राजकीय आखाड पिंपरी-चिंचवडमध्ये तसा रंगलाच नाही. त्यामुळे राजकीय कार्यकर्ते पांढऱ्या- तांबड्या रश्य़ाला मुकले. परिणामी त्यांनी स्वतच आपापला आखाड केला. अपवाद म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांनी मात्र, आखाड साजरा केला. परिणामी यावर्षीचा आखाड सत्ताधाऱ्यांचाच राहिला. विरोधक आखाड मेजवान्यांतही विरोधकांतच बसले. अपवाद फक्त शिवसेनेच्या एका पार्टीचा होता. दोन्ही काँग्रेसने यावेळी आखाड केलाच नाही.

दरवर्षी आखाड शहरात जोरात होतो. काही हॉटेले त्यासाठी महिनाभर सजलेली असतात. यावेळी, मात्र आखाड वैयक्तिकच अधिक साजरा झाला. सामुहिक होणारा राजकीय आखाड तसा झालाच नाही. त्यातही आखाड संपता संपता सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी तो केला. शेवटच्या आठवड्यात या पार्ट्या रंगल्या. तसेच तो हॉटेलात साजरा करण्याकडे यावेळी कल अधिक होता. शेवटच्या दिवशी भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची आखाड पार्टी एका हॉटेलात झाली. त्याच्या आदल्या दिवशी याच पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्याचा आखाड हॉटेलातच झाला. तर, या माजी पदाधिकाऱ्याच्या आखाडापूर्वी नुकताच पदभार घेतलेल्या नव्या पदाधिकाऱ्याने आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना एका ताराकिंत हॉटेलात जंगी मेजवानी दिली. 

सध्या राज्यभर मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे. त्यात आत्महत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर आखाड मेजवान्यांचे आयोजन करणे काही राजकीय पुढाऱ्यांनी आवर्जून टाळले. नाशिक येथे वाढदिवसाची नुकतीच झालेली पार्टी वादात सापडल्याने त्यापासून बोध घेत पिंपरीत खासदार, आमदार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आखाड पार्ट्या आयोजनापासून चार हात दूरच राहणे पसंत केले. तसेच सध्या कुठलीही निवडणूक तोंडावर नाही. लोकसभेला दहा महिन्याचा, तर विधानसभेला 14 महिन्यांचा अवकाश आहे. त्यामुळेही आखाड मेजवान्या रंगल्या नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख