PCMC anniversary : General body meeting | Sarkarnama

 पिंपरी पालिकेच्या सभेची लावणीने सुरवात; "झिंगाट'ने समारोप 

उत्तम कुटे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

या सभेत अधिकारी हे नगरसेवक झाले होते. तर, नगरसेवक अधिकारी बनले होते. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर नितीन काळजे यांनीही आपापल्या खुर्च्यांची अदलाबदल केली होती. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनीही अशाच प्रकारे भूमिकेची अदलाबदल केली होती. 

पिंपरी : अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या कपड्यात इलेक्‍ट्रॉनिक चीप, पंतप्रधान आवास योजनेत पदाधिकारी,अधिकारी व त्यांच्या नातेवाइकांना शंभर टक्के आरक्षण, कॅन्टिमध्ये सायरन, पाण्यासाठी एटीएम, प्रभागात नगरसेवकांना फिरण्यासाठी रिंगरोड, पिंपरी-चिंचवड ते पुणे महापालिका जलवाहतुकीसाठी पाणबुडी, सभागृहाच्या प्रवेशव्दारावर हजेरीपत्रकाच्या जोडीने आरसा व ब्युटीशियनही असे ठराव आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आले.

 मात्र, ही नेहमीची आमसभा तथा मासिक सर्वसाधारण सभा नव्हती. तर, पालिकेच्या 35 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेली अभिरूप महासभा होती. तिची सुरवात "वंदे मातरम'ऐवजी "या रावजी, बसा भावोजी' या लावणीने झाली. समारोप "सैराट'मधील झिंगाट गाण्याने करण्यात आल्याने धमाल उडाली. 

या सभेत अधिकारी हे नगरसेवक झाले होते. तर, नगरसेवक अधिकारी बनले होते. आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर नितीन काळजे यांनीही आपापल्या खुर्च्यांची अदलाबदल केली होती. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनीही अशाच प्रकारे भूमिकेची अदलाबदल केली होती. 

नियमित सभेसारखा गोंधळ,तोडफोड,फाडाफाड यावेळीही झाली. यानिमित्त पदाधिकाऱ्यांवरील सुप्त राग विनोदाच्या अंगाने का होईना अधिकाऱ्यांनी काढला. नेहमीच्या सभेतील अधिकाऱ्यांची नक्कल नगरसेवकांनी,तर नगरसेवकांची नक्कल अधिकाऱ्यांनी यावेळी केल्याने धमाल आली. एका गोंधळी "नगरसेवकाला'या सभेत निलंबित करण्यात आले. 

सभेच्या अजेंड्यावर आठ विषय होते. अधिकाऱ्यांच्या टेबलवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा विषय उल्हास जगताप यांनी अर्धवट वाचला. त्यावर पूर्ण प्रस्ताव वाचा, असे महापौर म्हणाले. त्यावर अर्धवट प्रस्ताव वाचण्याची येथील परंपरा आहे, असे सांगताच सभागृहात एकच हशा पिकला. प्रभागात फिरण्यासाठी नगरसेवकांना रिंगरोड करावा, या प्रस्तावाला टोलनाका बसवून त्याचे उत्पन्न नगरसेवकांना द्यावे, अशी उपसूचना आली. त्यावर खुलासा करताना मुख्य लेखापाल सीमा सावळे यांनी जीआर प्रमाणेच काम करणार, असे विदर्भातील भाषेत उत्तर देत सर्वांची दाद मिळविली. 

नगरसेवकांच्या परदेश दौऱ्याचा विषय मंजूर झाला. त्यावर चर्चेची मागणी करणाऱ्यांना, "विषय मंजूर झाल्यावरही चर्चा करण्याची येथील परंपरा आहे,' असे सांगत सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. या विषयाबाबत खुलासा करण्याची मागणी झाली. त्यावर, त्यांनी माझ्या कानात खुलासा केला आहे,' असे "महापौर'म्हणताच सर्वांना हसू आवरले नाही. 

पुरेसा पाऊस पडूनही पाणीपुरवठा विस्कळित असल्याने नेमके पाणी मुरते कुठे? याबाबतचा प्रश्‍न चर्चेसाठी होता. त्यावर संभाजी ऐवले यांनी पाणी टंचाईमुळे शहरात पाण्याचे एटीएम सुरू करावेत, अशी मागणी केली. त्यावर कुठेच पाणी मुरू देऊ नका, असे सांगत महापौरांनी या विषयाला मंजुरी दिली. रावेत ते पुणे मनपा जलवाहतुकीसाठी योगेश कडुसकर यांनी पाणबुडीही खरेदी करण्याची उपसूचना दिली. त्याला विरोध करताना संजय कुलकर्णी यांनी नदी प्रदूषित असताना जलवाहतूक नको, असे सांगत प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण विभाग करतोय तरी काय, असा सवाल उपस्थित केला. 

बायोमेट्रिक हजेरीसाठी प्रवेशद्वाराजवळ आरसे बसविण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी होता. त्यावर प्रवीण तुपे यांनी आरशांसोबत ब्यूटिशियन ठेवावी, अशी उपसूचना दिली. संभाजी ऐवले यांनी "चौकात भेटा मग दाखवतो,' अशी बातमी वाचल्याचे सांगत, "काय दाखवायचे ते येथेच दाखवा,' असे सांगितल्याने एकच हशा पिकला. मात्र हा वादग्रस्त विषय असल्याचे सांगत सभागृहाच्या कामकाजातून तो वगळण्यात यावा, असा आदेश "महापौरांनी' दिल्याने पुन्हा हशा झाला. 
 

संबंधित लेख