पिंपरी प्रशासनावर आर्थिक देवाणघेवाणीचा आरोग्यप्रमुखांचा आरोप 

पिंपरी प्रशासनावर आर्थिक देवाणघेवाणीचा आरोग्यप्रमुखांचा आरोप 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पालिकेत सत्तापालट झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत एक आक्रीत घडले आहे. पूर्वीचे सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीने (एनसीपी) पालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. के. अनिल रॉय यांना दिलेली बढती चुकीची असल्याचा साक्षात्कार सध्याचे सत्ताधारी भाजपला सव्वाचार वर्षानंतर झाला आहे. त्यामुळे त्यांनी ही बढती आता रद्द करण्याचे ठरविले आहे. या साऱ्या प्रकारामुळे रॉय यांच्यावरवर स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस)घेण्याची पाळी आली आहे. 

राजकीय दबावामुळे आणि आर्थिक देवाणघेवाणीतून हा निर्णय प्रशासनाने घेतल्याचा सनसनाटी आरोप आरोग्यप्रमुख तथा पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केला आहे. यामुळे डॉ.राय यांना सहजासहजी व्हीआरएस देते की त्यांच्यावर कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

राष्ट्रवादी सत्तेत असताना 1 जून 2013 रोजी पालिकेत डॉ. राय यांना बढती देऊन पालिकेचे आरोग्यप्रमुख तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी करण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी सत्ताबदल होऊन पालिकेत भाजप प्रथमच सत्तेत आला. विधी समितीने नुकतीच डॉ.राय यांना दिलेली बढती अयोग्य ठरवून त्याजागी सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्या नियुक्तीचा ठराव केला. तसेच तो मंजुरीसाठी आमसभेकडे पाठविला आहे. 

हे समजताच डॉ. रॉय यांनी पदावर राहणे आता संयुक्तिक वाटत नसल्याचे सांगत व्हीआरएससाठी प्रशासनाकडे काल (ता.13) अर्ज केला. आपल्यावर प्रशासनाचा विश्वास राहिला नसल्याने व्हीआरएस घ्यावा लागत असल्याचे या अर्जात म्हटले आहे. तसेच तब्बल सव्वाचार वर्षानंतर आपली बढती अयोग्य असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. राजकीय दबावातून आर्थिक देवाणघेवाण झाल्याने हा निर्णय झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. 

व्हीआरएससाठी काय कागदपत्रे लागतील त्याचा तपशील त्यांनी या अर्जाव्दारे सहाय्यक आयुक्त (प्रशासन) डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे केलेल्या या अर्जाव्दारे मागितला आहे. पालिका प्रशासन व पालिकेतील नव्या सत्ताधाऱ्यांवर डॉ. रॉय यांनी या पत्रात गंभीर आरोप केले आहेत. 

राज्य सरकारनेच याबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले होते. त्यानुसार कार्यवाही सुरु केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाबाबत यथोचित निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या विभागीय पदोन्नती सभेत आयुक्त हार्डीकर यांनी सावध पवित्रा घेऊन आरोग्य वैद्यकीय अधिकारी पद आणि वैद्यकीय संचालक पद समकक्ष असून त्याबाबतचा निर्णय विधी समितीने आणि महासभेने घ्यावा, अशी शिफारस केली होती. त्यानुसार विधी समितीने 8 सप्टेंबर रोजी आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी डॉ. पवन वसंत साळवे यांच्या नावाची शिफारस केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com