Pawana Dam Water Issue | Sarkarnama

पवनेच्या पाण्याने भाजपला फेस

उत्तम कुटे
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

सध्या शहरासाठी दररोज लागणारे 469 दशलक्ष लीटर पाणी पवना नदीतूनच (बंधारा) उचलले जाते. पवना धरणापासून हे ठिकाण 70 किलोमीटर दूर असल्याने वीस टक्के पाण्याची गळती,निचरा,वाफ होऊन ते वाया जात आहे. बंद जलवाहिनीमुळे हा पाण्याचा अपव्यय थांबणार आहे. मात्र, त्यासाठी जमिन जात असल्याने मावळातील शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा अत्यंत महत्वाकांक्षी व जनतेच्या  जिव्हाळ्याचा पवना बंद जलवाहिनी प्रकल्प गेल्या सहा वर्षापासून बंद आहे. तो पुन्हा सुरु केला,तर भाजपच्या मावळ या बालेकिल्लातील मतदार दुखावणार आहे. दुसरीकडे तो बंद केला, तर नव्याने कब्जा केलेल्या पिंपरी-चिंचवडच्या त्यांच्या गडाला सुरुंग लागण्याची भीती आहे. त्यामुळे तत्कालीन राज्यातील आघाडी सरकारने सुरु केलेल्या या प्रकल्पामुळे सध्याच्या युतीच्या राज्य सरकारची अवस्था इकडे  आड,तिकडे विहीर झाली आहे.

उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. आता ते आयटी हब म्हणूनही बंगळूरनंतर देशात नावारूपास येत आहे. त्यामुळे मोठ्या झपाट्याने वाढत चाललेल्या या शहरावर नागरी सुविधा देताना मोठा ताण येत आहे.25 वर्षापूर्वी चार गावे असलेल्या पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या आता 22 लाख झाली असून स्वतंत्र पालिका असलेल्या उद्योगनगरीत लवकरच स्वतंत्र पोलिस आयुक्तालयही होऊ घातले आहे. त्यामुळेच शहराची भविष्यातील गरज आणि वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन राज्यातील तत्कालीन आघाडी सरकार व राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पिंपरी पालिकेने शहराला बंद जलवाहिनीव्दारे पवना धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प हाती घेतला.

सध्या शहरासाठी दररोज लागणारे 469 दशलक्ष लीटर पाणी पवना नदीतूनच (बंधारा) उचलले जाते. पवना धरणापासून हे ठिकाण 70 किलोमीटर दूर असल्याने वीस टक्के पाण्याची गळती,निचरा,वाफ होऊन ते वाया जात आहे. बंद जलवाहिनीमुळे हा पाण्याचा अपव्यय थांबणार आहे. मात्र, त्यासाठी जमिन जात असल्याने मावळातील शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. त्यावरून सहा वर्षापूर्वी झालेल्या जनआंदोलनात तीन शेतकऱ्यांचा बळीही गेला आहे. मावळ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तेथील या पक्षाचे आमदार बाळा भेगडे यांचाही या प्रकल्पाला तीव्र विरोध असून त्यांनी तर तो गुंडाळण्याचीच मागणी केली आहे.

2014 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यावेळी राज्यात विरोधी बाकावर असलेल्या भाजपने सत्तेवर आलो,तर हा प्रकल्प बंद करू, असे आश्वासन दिले होते.ते त्यांना तीन वर्षात पूर्ण करता आलेले नाही. दरम्यान, या प्रकल्पाव्दारे पाणी मिळणाऱ्या पिंपरी -चिंचवड पालिकेतही याच पक्षाची सत्ता आल्याने त्यांची अवस्था आता इकडे आड, तिकडे विहीर अशी आणखी बिकट झाली आहे.

ही योजना बंद केली,तर पिंपरी-चिंचवडवर अन्याय होईल. तसेच मोठ्या मुष्किलीने अजित पवार यांच्याकडून  सर केलेला हा त्यांचा बालेकिल्ला पुन्हा पडण्याची भीती त्यांना सतावत आहे. तसेच त्यावर आतापर्यंत खर्च केलेले सव्वाशे कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत.एवढेच नाही,तर पाण्याची मोठी बचत करणारा ही योजना गुंडाळल्यानंतर मोठ्या टीकेचे धनीही व्हावे लागण्याची चिंता त्यांना आतापासूनच सतावू लागली आहे. तसेच शहराला 24 तास पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेलाही त्यामुळे खीळ बसणार आहे. या योजनेतूनही पाण्याची मोठी गळती व चोरी थांबण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे हा प्रकल्प सुरु केला,तर मावळातील बालेकिल्याचा मतदार नाराज होणार आहेत. यामुळे दुहेरी कात्रीत सापडल्याने केंद्र, राज्य व पालिकेत सत्ता येऊनही आणि मावळातही आपलाच आमदार असूनही गेल्या तीन वर्षात भाजपला हा तिढा सोडविता आलेला नाही.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर याबाबत निर्णय घ्यावाच लागणार आहे. मात्र, तो काय होतो यावर  पिंपरी-चिंचवडसह मावळातील पुढील राजकारण कसे व काय वळण घेणार हे ठरणार आहे. त्याचा परिणाम त्यानंतर चारच महिन्यांनी होणाऱ्या लोकसभेला दिसणार
असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान 2008 मध्ये सुरु होऊन 2011 मध्ये बंद पडलेल्या त्यावेळी चारशे कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची किंमत आता एक हजार कोटीवर गेली आहे.

संबंधित लेख