patil and pawar | Sarkarnama

त्यांनी दहा मिनिटात कालव्याचा निर्णय घेतला आणि गंगापूर, वैजापूरला पाणी मिळाले !

रामकृष्णबाबा पाटील माजी खासदार, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते
बुधवार, 12 डिसेंबर 2018

औरंगाबाद : शरद पवार हे मुरब्बी राजकारणी, पण विकासाच्या कामात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. माझे त्यांचे राजकीय मतभेद होते पण जेव्हा गंगापूर, वैजापूर तालुक्‍याच्या पाण्याचा प्रश्‍न आला, तो मी विधानसभेत मांडला तेव्हा अवघ्या दहा मिनिटात एक्‍स्प्रेस कालवा तयार करण्यासाठी शरद पवारांनी 60 कोटींचा निधी दिला आणि तीन वर्षात गंगापूर, वैजापूर तालुक्‍याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटल्याची आठवण औरंगाबादचे माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामकृष्णबाबा पाटील यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली. 

औरंगाबाद : शरद पवार हे मुरब्बी राजकारणी, पण विकासाच्या कामात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. माझे त्यांचे राजकीय मतभेद होते पण जेव्हा गंगापूर, वैजापूर तालुक्‍याच्या पाण्याचा प्रश्‍न आला, तो मी विधानसभेत मांडला तेव्हा अवघ्या दहा मिनिटात एक्‍स्प्रेस कालवा तयार करण्यासाठी शरद पवारांनी 60 कोटींचा निधी दिला आणि तीन वर्षात गंगापूर, वैजापूर तालुक्‍याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटल्याची आठवण औरंगाबादचे माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रामकृष्णबाबा पाटील यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली. 

रामकृष्णबाबा पाटील म्हणाले, 1990 मध्ये मी वैजापूरचा आमदार होतो. आमच्या व शेजारच्या गंगापूर तालुक्‍यातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होता. साधरणता 1972 मध्ये तत्कालीन महसूल मंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते नांदूर-मधमेश्‍वर धरणाचे भूमिपूजन झाले. पण नाशिक जिल्ह्यातील चार धरणातून नांदूर मधमेश्‍वर मध्ये पाणी वाहून आणायचे तर कालवा कसा तयार करावा हे कुणालाच सूचत नव्हते. सुधारकराव नाईक यांच्यासह त्यावेळच्या सगळ्याच पुढाऱ्यांनी त्यावर विचार केला. नांदूर-मधमेश्‍वर मध्ये पाणी आणण्यासाठी मराठवाडा काय करतो याकडे शंकराव कोल्हे यांचे बारकाईने लक्ष होते. कालव्या संदर्भात निर्णय होत नसल्याची संधी साधत त्यांनी विधानसभेत मुकणी धरणात साठत असलेले 40 टक्के पाणी गोदावरी कालव्यात टाकून ते नगर-नाशिककडे वळवण्याची मागणी केली. 

शरद पवारांना भेटलो आणि मार्ग निघाला.. 
हातातोंडाशी आलेले पाणी जाते की काय ? अशी भिती मनात होती. क्षणाचाही विलंब न लावता मी शरद पवारांना भेटलो. नांदूर-मधमेश्‍वर मध्ये नाशिक जिल्ह्यातील चार धरणांतून पाणी आणण्यासाठी मार्ग सूचवा अशी त्यांना विनंती केली. पवार साहेबांनी तात्काळ त्यावेळचे जलसंपदा मंत्री पद्मसिंह पाटील यांना बोलावले, सोबत अर्थमंत्री, संबंधित खात्याचे सचिव यांची बैठक घेतली आणि अवघ्या दहा मिनिटांत 128 किलोमीटर लांबीचा एक्‍स्प्रेस कालवा तयार करण्याचा निर्णय घेतला. पद्मसिंह पाटलांना विधानसभेत तशी घोषणा करायला लावली, शंकरराव कोल्हेची गोदावरी कालव्यात पाणी टाकण्याची मागणी फेटाळून लावली. तीन वर्षात प्रत्येक वर्षी वीस असे एकूण 60 कोटी रूपये दिले आणि कालव्याच्या कामाला सुरूवात झाली. हा कालवा झाला नसता तर अजूनही गंगापूर, वैजापूर तालुक्‍याला पाण्यासाठी झगडावे लागले असते. 

त्यामुळे या दोन्ही तालुक्‍यातील तब्बल एक लाख एकर जमीन आज सिंचनाखाली आली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटला. याचे खरे श्रेय शरद पवारांनाच जाते. एवढेच नाही तर रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेसाठी देखील शरद पवारांनी मदत केली. ज्यामुळे 15 हजार एकर भाग ओलीता खाली आला. खऱ्या अर्थाने गंगापूर-वैजापूर तालुक्‍याच्या पाण्याचे जनक शरद पवार हेच आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. दूरदृष्टी आणि जनतेच्या प्रश्‍नांची जाण असणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व शरद पवार यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त मी त्यांना दिर्घायुष्य व निरोगी जीवन लाभो अशा शुभेच्छा देतो. 

(शब्दांकनः जगदीश पानसरे) 
 

संबंधित लेख