कन्नड विधानसभेसाठी कॉंग्रेसकडून पाटील-कोल्हे यांच्यापैकी संधी कुणाला ?

कन्नड विधानसभेसाठी कॉंग्रेसकडून पाटील-कोल्हे यांच्यापैकी संधी कुणाला ?

कन्नड : कॉंग्रेसच्या नुकत्याच झालेल्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कन्नड- सोयगाव विधानसभा मतदार संघात माजी आमदार नितीन पाटील आणि माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. दोघांनी इथे उमेदवारीसाठी दावा केला आहे. आता या दोघांपैकी कोण भारी ठरणार याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. गेल्या तीन निवडणुकांत कॉंग्रेस पक्षाला या मतदारसंघात अपयश आल्याने,पक्ष तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार विरोधात ग्रामीण जनतेत मोठा असंतोष दिसत असल्याने कॉंग्रेस तालुक्‍यात यशाची अपेक्षा बाळगून आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्याही वाढल्याचे दिसते. 

कॉंग्रेस पक्षातून माजी आमदार नितीन पाटील, संतोष कोल्हे, अनिल पाटील सोनवणे, माजी तालुका प्रमुख अशोक मगर आदीनी नेते उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने आलेल्या नेत्यांसमोर इच्छुकांनी आपल्या परीने शक्तीप्रदर्शनही केले. दरम्यान संतोष कोल्हे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वावर थेट टीका करत खळबळ उडवून दिली. यामुळे कोल्हे चांगलेच चर्चेत आले. कॉंग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील यांचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर शिवसेनेचे नामदेव पवार व त्यानंतर सलग दोनदा आमदार हर्षवर्धन जाधव विजयी झाले. त्यामुळे कॉंग्रेसला गेल्या तीन निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. यंदा पक्ष चांगल्या मजबुतीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. 

जिल्ह्यात आमदार अब्दुल सत्तार यांचा प्रभाव असून ते कोणाच्या बाजूने कौल देतात यावर दोघांचे भविष्य अवलंबून असल्याचे बोलले जाते. नितीन पाटील हे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे चिरंजीव असून जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून त्यांची तालुक्‍याच्या राजकारणावर चांगली पकड आहे. त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेले धरणे, तलाव, कोल्हापुरी बंधारे असे सिंचन प्रकल्प तसेच रस्ते, शहराचे विस्तारीकरण या प्रमुख विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत . 

दुसरीकडे संतोष कोल्हे यांची गेल्या पंधरा वर्षांपासून नगर पालिकेवर एकहाती सत्ता आहे. कार्यकर्यांच्या रूपाने लाभलेला मोठा मित्र परिवार हे त्यांचे मूळ बलस्थान आहे. हायकमांडकडून 'कामाला लागा'असा आदेश आल्याने ते मैदानात उतरले असल्याचे बोलले जाते. गेल्या पंधरा वर्षात शहरात केलेला विकास मॉडेल तालुकाभर विस्तारित करण्याच्या मानसिकतेतून ते मैदानात उतरत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com