Patan : Shivsena's Shambhuraje Desai versus NCP and BJP | Sarkarnama

पाटणला  शंभूराज  देसाईं विरोधात राष्ट्रवादी, भाजपची मोर्चे बांधणी

उमेश बांबरे :सरकारनामा
मंगळवार, 11 जुलै 2017

सातारा    :   पाटण मतदारसंघात राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांनी लक्षघालण्यास सुरवात केली आहे. येथून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीसुरू झाली आहे. ही चाचपणी विद्यमान शिवसेनेचे आमदार  शंभूराज देसाईं विरोधात मोर्चे बांधणी आहे. राष्ट्रवादीकडे उमेदवार आहे पण भाजपला उमेदवार तयार करावा लागणार आहे.

सातारा    :   पाटण मतदारसंघात राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांनी लक्षघालण्यास सुरवात केली आहे. येथून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीसुरू झाली आहे. ही चाचपणी विद्यमान शिवसेनेचे आमदार  शंभूराज देसाईं विरोधात मोर्चे बांधणी आहे. राष्ट्रवादीकडे उमेदवार आहे पण भाजपला उमेदवार तयार करावा लागणार आहे.

पाटण तालुक्‍यात नुकताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा धावता दौरा झाला. यावेळी पाटणचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत सत्यजितसिंह
पाटणकरांना शरद पवारांनी काही कानमंत्र दिला. तसेच मतदारसंघात लक्ष घालण्याची सूचना केली. पवारांनी जाता जाता आगामी निवडणुकीसाठी पाटणमधून कोणाला उभे करता येईल, याचा अंदाज बांधून हे सूचक विधान केले आहे.

 तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षानेही पाटण तालुक्‍यात उमेदवाराची शोधाशोध सुरू केली आहे. भाजपला पाटण शहरात चांगला चेहरा हवा आहे, तो विक्रमबाबा  पाटणकरांच्या माध्यमातून मिळू शकतो. काल बोरिव (ता. कोरेगाव) ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महसुल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आले होते. त्यावेळी त्यांची विक्रमबाबा पाटणकर यांनी भेट घेतली. ही भेट धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्‍नासंदर्भात असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात तेथे राजकिय पूनर्वसनाची चर्चा झाल्याची भाजप कार्यकर्त्यांत चर्चा आहे.

मुळात पाटणचे राष्ट्रवादीचे माजी आमदार
विक्रमसिंह पाटणकर यांचे विक्रमबाबा पाटणकर हे कार्यकर्ते होत. पाटणकरांच्या भावकितील असल्याने त्यांना काही महत्वाची पदेही मिळाली. मागे ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही झाले.नुकत्याच झालेल्या जिल्हा
परिषदेच्या निवडणुकीपासून या दोघांचे फिस्कटले आहे. त्यावेळपासून विक्रमबाबा स्वतंत्र होऊन स्थिर स्थावर होण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार विक्रमसिंह
पाटणकरांच्या पॅनेलमधून विक्रमबाबा पाटणकर हे निवडून आले आणि सभापती झाले आहेत. त्यामुळे पाटणकरांसोबत राहून त्यांना पदे भुषविता आली पण दोघांतील वर्चस्व वादातून विक्रमबाबांना स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याची संधी हवी होती.

 आता आगामी निवडणुकीसाठी विक्रमबाबांनी माजी आमदार विक्रमसिंह पाटणकरांचे सुपूत्र सत्यजितसिंहां विरोधात शड्डू टाकण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी भाजपशी जवळीक असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर विक्रमबाबा पाटणकर व मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या चर्चेतील राजकारण नेमके काय, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.

आगामी काळात भाजप पाटणमध्ये नवीन चेहऱ्याच्या माध्यमातून शंभूराज देसाई आणि सत्यजितसिंह पाटणकरांविरोधात रणनिती आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ही भेट आणि चर्चा असे मानले जात आहे. शरद पवारांनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिलेला कानमंत्र आणि विक्रमबाबा पाटणकरांची महसूल मंत्री चंद्रकांत दादांशी झालेली चर्चा ही आगामी काळात शंभूराज देसाईंविरोधात पाटणमध्ये मोर्चे बांधणीचे संकेत आहेत. आता शंभूराज देसाई या दोन्ही घटनेतून बोध घेऊन नेमकी कोणती व्ह्युव रचना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख