paschim maharashtra devsthan samiti | Sarkarnama

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर "आमदार सौभाग्यवती'! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

दृष्टिक्षेपात देवस्थान समिती : 
कार्यक्षेत्र : कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग 
एकूण देवस्थाने : 3066 
देवस्थानची जमीन : 10, 492 हेक्‍टर 
संचालक मंडळाचे स्वरूप : एक अध्यक्ष, एक खजिनदार व पाच सदस्य 
सचिव : महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी  

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांपासून रिक्त असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांची तर खजानिसपदी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वैशाली क्षीरसागर यांची नियुक्ती झाली. 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विरुद्ध भाजपचे महेश जाधव यांची लढत झाली होती. यात क्षीरसागर विजयी झाले होते. आता युतीच्या धर्मामुळे या दोन्ही विरोधकांनी देवस्थान समितीत अप्रत्यक्षपणे बरोबर काम करावे लागणार आहे. 

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री. जाधव यांच्या निवडीची घोषणा केली. या निवडीसाठी पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रचंड ताकद लावली होती. श्री. जाधव यांच्या रूपाने निष्ठावंत पक्ष कार्यकर्त्याला हा मान तर मिळालाच पण या निवडीने जाधव यांनीही आपल्या पक्षातील विरोधकांना चांगलीच चपराक दिल्याचे बोलले जाते. 
कोल्हापूरसह सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या देवस्थान समितीचे अध्यक्षपद 2012 पासून रिक्त होते. या पदाचा कार्यभार सद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे होता. राज्यात भाजप आघाडीचे सरकार आल्यानंतर अनेकांची नांवे या पदासाठी चर्चेत होती, प्रत्यक्षात कोणाचीही वर्णी लागलेली नव्हती. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर "शाहू-कागल' चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भारतीय जनता पक्षात केल्यानंतर त्यांना एप्रिलमध्ये पुणे- म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर पुन्हा देवस्थान समिती अध्यक्ष आणि खजानीस पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. काल या दोन्ही निवडींची घोषणा झाली. विद्यमान संचालकांची मुदत संपल्यानंतर तेथे नवीन संचालकांच्या निवडी होतील. 

 

संबंधित लेख